मुंबई, 16 ऑक्टोबर: दोन दिवसांपूर्वी राज्यातून मान्सून पुर्णपणे परतला (Monsoon withdrawn) आहे. मान्सून गायब झाल्यानंतर आता राज्यात किमान तापमानात (temperature in maharashtra) किंचित घट झाली असून अनेक ठिकाणी गारवा जाणवत आहे. पण मुंबईत अद्याप दमट आणि गरम हवामानाची नोंद करण्यात आली आहे. असं असलं तरी पुढील 48 तासांत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा (Rain in maharashtra) इशारा देण्यात आला आहे. आज विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार आहेत. आज नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, बुलडाणा, जालना, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर आणि गडचिरोली अशा एकूण अठरा जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याच्या तज्ज्ञांकडून परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हेही वाचा- पालकांनो सावधान! कोरोनाबद्दल नवं संशोधन, लहान मुलांबाबत समोर आल्या या बाबी सध्या बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. हे क्षेत्र पुढील काही तासांत आणखी तीव्र बनण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओडिशाच्या किनारपट्टीवर जोरदार पाऊस धडकण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात देखील विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार आहे. उद्याही राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मात्र राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
राज्यात पुढचे 2 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; 16-17 ऑक्टोबर...बंगालच्या उपसागरातील कमी दा़बाच्या क्षेत्राचा प्रभाव.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 16, 2021
विदर्भ, सलग्न मराठवाडा भाग आणी उत्तर मध्य महाराष्ट्र काही भागात.
- IMD pic.twitter.com/ABLOZ373cR
दुसरीकडे, राज्यातून मान्सून माघारी गेल्यापासून, अनेक ठिकाणी किमान तापमानात घट झाली आहे. तर पहाटे हवामानात किंचीतचा गारवा जाणवत आहे. आज महाबळेश्वरमध्ये 15.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर सातारा (18.7), नाशिक (16.3), सोलापूर (18.6), औरंगाबाद (18.4), पुणे (18.4) आणि बारामती 18.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

)







