मुंबई, 01 फेब्रुवारी : रेल्वे स्थानकांवर आढळणारे मनोरुग्ण, भिकारी या वंचित घटकांकडे समाज घृणास्पद नजरेने पाहत असतो. त्यांचे वाढलेले केस दाढी आणि शरीरातून येणारा वास हे पाहून त्यांच्याजवळ जाण्याचे धाडस कोणीही करत नाही. परंतु तेही समाजाचा एक भाग आहेत. त्यांनाही नीटनेटके दिसावे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा या हेतूने रवींद्र बिरारी हे पुढे आले आहेत. त्यांनी कोणतीही लाज न बाळगता अशा घटकांचे केस आणि दाढी करण्याचा विडा उचलला आहे. मुंबईतील टिटवाळा येथे राहत असलेले 38 वर्षीय बिरारी हे आठवड्यातून एक दिवस नाकारलेल्या घटकांसाठी देतात. केस व दाढी करण्याचे साहित्य घेऊन टिटवाळा ते भांडुप या प्रवासात विविध स्थानकांवर असणारे मनोरुग्ण, भिकारी व्यक्ती शोधून त्यांचे केस कापतात. आत्तापर्यंत त्यांनी अशा प्रकारे 800 जणांचे केस मोफत कापले आणि दाढी केली आहे. बिरारी यांचे भांडुप येथे स्वतःचे सलून आहे.
कशी झाली सुरुवात? रवींद्र सांगतात की, एकदा ट्रेनची वाट पाहत असताना माझ्यासोमर काही भिकारी वाढलेले केस, मळकटलेले कपडे अशा अत्यंत वाईट अवस्थेत बसलेले दिसले. त्यांना पाहून मनात विचार आला की या लोकांना काही खायला देण्यापेक्षा त्यांना चांगलं आयुष्य देण्यासाठी आपल्याला काय करता येईल. संत गाडगेबाबा आणि बाबा आमटे यांना आपले आदर्श मानणाऱ्या रवींद्र बिरारी यांनी त्यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून आपल्यात असलेल्या केस कर्तनाच्या माध्यमातून या गोरगरिबांना चांगले आयुष्य देण्याचे ठरवले आणि इथून त्यांचा प्रवास सुरू झाला. मारही खावा लागला रवींद्र हे गेल्या दहा वर्षापासून काम करत असून आत्तापर्यंत त्यांनी 800 जणांचे केस कापून दिले आहेत. यामध्ये स्त्रिया आणि पुरुष दोघांचाही समावेश आहे. आपल्याला वाटेल हे काम खूप सोपे असेल पण प्रत्यक्षात तसे नसून हा प्रवास त्यांच्यासाठी खूप खडतर होता. त्यात त्यांना सुरुवातीला या दारिद्र्य अवस्थेत असलेल्या भिकाऱ्यांनी त्यांना हटकवले तर काहींचा त्यांना मारही खावा लागला. मात्र, रवींद्र यांनी धीर सोडला नाही आणि आपले काम सुरूच ठेवले नंतर आपल्या बोलण्यातून कृतीतून त्यांनी या गरीब लोकांशी संवाद साधला आणि त्यांचे केस कापण्याचे काम थोडे सोपे होत गेले.
चालतं फिरतं सलून सुरू करणार या सेवेला आता वेगळ्या पद्धतीने म्हणजे चालतं फिरतं सलून सुरू करायचं आहे. फूटपाथवर राहणाऱ्या गरजू लोकांना स्वाभिमान वाटला पाहिजे. चांगल्या सलून मध्ये मी केस कापत आहे. त्यांना ही खंत वाटली नाही पाहिजे की मी गरजू आहे म्हणून माझी रस्त्यावर, फुटपाथवर केस कापतात. लवकरात लवकर मुंबई मध्ये हे सलून सुरू होणार असल्याचं रवींद्र यांनी सांगितले.