धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 1 एप्रिल : सिंलेडर, भाजीपाला, अन्नधान्य यांच्या दरात वाढ झाल्याने सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच आता फळांच्या दरातही वाढ झाली आहे. सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू असल्याने फळांची मागणी वाढली आहे. तर फळबाजारातही आवक वाढली आहे. असे असूनही फळांच्या दरात लक्षणीय रित्या वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबईतील महात्मा जोतिबा फुले मंडईत रमजाननिमित्त विविध प्रकारची फळे दाखल झाली आहेत. विशेषतः रमजान महिन्यात कलिंगड, आंबा, पपई, केळी, संत्री, खरबूज, टरबूज यांना जास्त मागणी असते. रमजान सनानिमित्त बाजारपेठेत उलाढाल वाढली असून, फळांचा बाजारही चांगलाच फुलला आहे. उपवास (रोजा) सोडण्यासाठी मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणात फळांची खरेदी करत असून, बाजारपेठेत रेलचेल आहे. गेल्या काही दिवसांपासून फळांची आवकही वाढली आहे.
यंदा फळांच्या भावात वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव व भगिनी महिनाभर उपवास पाळतात. पहाटे सूर्योदयापूर्वी उपवास (सहेरी), तर सायंकाळी सूर्य मावळण्यानंतर मगरीबची आजान (बांग) झाल्यानंतर रोजा इफ्तार केला जातो. हा रोजा इफ्तार करताना , केळी, अननस, कलिंगड, संत्री, मोसंबी, सफरचंद, चिकू इत्यादी फळांसह घरगुती खाद्यपदार्थांची मेजवानी असते.
फळे आणखी महाग होणार
यंदा रमजान महिन्यात फळांची आवक बाजारात वाढलेली आहे. बाजारामध्ये कलिंगड, संत्री, मोसंबी, केळी, चिकू, डाळिंब, खरबूज, टरबूज अशा विविध फळांची मागणी वाढली आहे. आणि मागणी वाढल्यामुळे या फळांच्या दरामध्ये 25 ते 30 टक्के वाढ झाली आहे. येत्या काळात जशी ईद जवळ येईल तशी फळांची मागणी आणखी वाढेल आणि त्यावेळेस आणखी पाच ते दहा टक्के दर वाढ होईल, असं फळं विक्रेते वसंत फलके सांगतात.
Mumbai Wholesale Market : क्रॉफर्ड मार्केटमध्ये 'या' ठिकाणी खरेदी करा सर्वात स्वस्त दागिने, Video
केळी : आधी 35 डझन आता 60 डझन
चिकू : आधी 100 आता 150
संत्री : आधी 40 आता 60
मोसंबी : आधी 40 आता 55
पपई : आधी 25 आता 40
कलिंगड : आधी 20 आता 30 किलो
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.