ठाणे (प्रतिनिधी) 28 मे : बोलण्यास नकार दिला म्हणून एका अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला (Attack on Minor Girl) करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना उल्हासनगर (Ulhasnagar Crime) कॅम्प नंबर २ परिसरात घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अल्पवयीन मुलीवर हल्ला करणारा आरोपीदेखील अल्पवयीन आहे. त्याने ब्लेडने या मुलीच्या शरीरावर अनेक ठिकाणी वार केले आहेत. या हल्ल्यात अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली आहे. एका घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
संबंधित मुलीवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगर कॅम्प ३ चोपडा कोर्ट भागात एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आई-वडील नसल्याने आपल्या आत्यासोबत राहाते. गुरुवारी सायंकाळी ही अल्पवयीन मुलगी कॅम्प नंबर २ भागात असलेल्या महापालिकेच्या बाल उद्यानामध्ये बसली होती. याचवेळी तिच्या ओळखीचा अल्पवयीन मुलगा त्या ठिकाणी आला आणि तू माझ्याशी बोलत का नाहीस? अशी विचारणा त्याने केली. मात्र, तुझ्याशी मला बोलायचं नाही, असे या अल्पवयीन मुलीनं त्याला सांगताच त्याने आपल्या खिशात असलेल्या ब्लेडच्या सहाय्याने तिच्यावर वार केले.
ही घटना घडत असताना या मुलीनं स्वतःच्या बचावासाठी आरडाओरड केली. त्यामुळे तिथे गर्दी जमल्याने आरोपीनं तिथून पळ काढला. दरम्यान रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या अल्पवयीन मुलीला एका व्यक्तीने उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात अल्पवयीन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेऊन त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
या अल्पवयीन मुलीची आरोपीसोबत पूर्वीपासून ओळख होती. त्यांचं अनेकदा बोलणंही झालं होतं. मात्र अचानक या मुलीनं या आरोपीसोबत बोलणं बंद केलं, त्यामुळे रागाच्या भरात या आरोपीने अल्पवयीन मुलीवर वार करून तिला जखमी केल्याची माहिती समोर येते आहे. उल्हासनगर शहरात आठवडाभरात हत्या, हत्येचा प्रयत्न यासारखे अनेक गंभीर गुन्हे घडत आहेत, त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Thane