मुंबई, 23 मे : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगत आहे. 'राज्यपाल आणि सरकारचे संबंध गोड आहेत. राज्यपाल आमचे मार्गदर्शक आहेत' अशी प्रतिक्रिया यावेळी संजय राऊत यांनी दिली. मात्र या भेटीतील एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून आता त्याबाबत संजय राऊत यांनी खुलासा केला आहे.
राज्यपालांची भेट घेताना संजय राऊत यांनी राजभवनात दाखल झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना वाकून नमस्कार केला. काही दिवसांपूर्वी याच संजय राऊत यांनी ट्विटरवरून राज्यपालांवर मोठी आगपाखड केली होती. त्यामुळे कोपरापासून दंडवत करणाऱ्या संजय राऊत यांचा फोटो सोशल मीडियावर बघता बघता व्हायरल झाला. त्यानंतर संजय राऊत यांनी यामागचं कारण सांगितलं आहे.
'भगतसिंग कोश्यारी हे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत म्हणून हा नमस्कार केला. अन्यथा आमच्या चांगला संवाद झाला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचं महाविकास आघाडी सरकार सुरळीतपणे सुरू आहे, असं मी त्यांना सांगितलं,' असं स्पष्टीकरण देत संजय राऊत यांनी तो व्हायरल फोटोही ट्वीट केला आहे.
Well ! @BSKoshyari is elder to me so this namaskar , otherwise we had good interaction , I told him not to worry, our MVA government under leadership of @officeofUT is running fine pic.twitter.com/ILPeFzlQ4q
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 23, 2020
संजय राऊत यांच्या या फोटोवरून भाजपनेही त्यांच्यावर निशाणा साधला आहे. 'धडकने लगा दिल, नजर झुक गई, कभी उन से जब 'सामना' हो गया', असं ट्वीट भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आलं आहे.
धडकने लगा दिल, नजर झुक गई
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) May 23, 2020
कभी उन से जब 'सामना' हो गया pic.twitter.com/LiYoDFJX2l
दरम्यान, राज्याचे राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात शासकीय निर्णय घेण्यावरून तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या भेटीला पोहोचले होते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी राजभवनावर जाऊन राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. संजय राऊत आणि राज्यपाल यांच्यात 15-20 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे. राज्यपालांची भेट घेऊन राजभवानातून बाहेर पडल्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
'राज्यपालांसोबत ही सदिच्छा भेट होती. खूप दिवसांपासून भेट घेण्याचं नियोजन होतं. पण, त्यांची काही भेट होऊ शकली नाही. त्यांचे आणि माझे जुने संबंध आहे. देशात काही घटना घडल्यात त्या संदर्भात मी नेहमी लिखाण करत असतो. त्यामुळे मी फक्त राज्यपालांसाठी लिहिलं असं काहीही नव्हतं' असं राऊत म्हणाले.
संकलन, संपादन - अक्षय शितोळे