Home /News /mumbai /

नववर्षाचं स्वागत घरीच करा! मुंबईत हॉटेल्सला रात्री 11 नंतर होम डिलिव्हरीला परवानगी

नववर्षाचं स्वागत घरीच करा! मुंबईत हॉटेल्सला रात्री 11 नंतर होम डिलिव्हरीला परवानगी

नूतन वर्षाचं स्वागत घरीच करा, पण रात्री 11 वाजताच पार्टी संपवू नका, असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलं आहे.

    मुंबई, 31 डिसेंबर: नववर्षाचा (new year 2021) स्वागत म्हटलं की पार्टी, जल्लोष आलाच. नववर्षांच्या स्वागतासाठी संपूर्ण जग सज्ज झाले आहेत. मात्र, यंदा कोरोनामुळे इतर सणांप्रमाणे नववर्षाच्या सेलिब्रेशनवर अनेक बंधणं आली आहेत. त्यात ब्रिटनमध्ये सापडलेला कोरोनाचा नवा प्रकार आता देशात दाखल झाला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. परंतु असं असताना मुंबई महापालिका प्रशासनानं मुंबईकरांसाठी थोडा दिलासा दिला आहे. नूतन वर्षाचं स्वागत घरीच करा, पण रात्री 11 वाजताच पार्टी संपवू नका, असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलं आहे. कारण आता मुंबईतील उपहारगृहांना (रेस्टॉरंट) 31 डिसेंबरच्या रात्री 11 वाजेनंतर घरपोच सेवा (होम डिलिव्हरी) करण्याची परवानगी देण्यात आली आहे.  मुंबईस सुरक्षितरित्या नवीन वर्षात पदार्पण करण्यासाठी कोरोनाविषयीच्या सर्व सुनिश्चित नियमांचे कोटेकोरपणे पालन करा, असं आवाहनही मुंबईकरांना करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्य सरकारनं कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका क्षेत्रात खबरदारी म्हणून रात्री 11 वाजेनंतर नंतर संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे घरी बसा, सुरक्षित राहा, असा संदेश महापालिकेनं दिला आहे. संशय आल्यास होणार ब्लड टेस्ट दुसरीकडे, थर्टी फर्स्टसाठी मुंबईत वाहतूक पोलीस सज्ज झाले आहेत. मद्य पिऊन गाडी चालविणाऱ्यांवर त्यांची नजर असणार आहे. संशय आल्यास ब्लड टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. रक्तात मद्य आढळल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. चालकच नाही तर त्याच्यासोबत असणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे. थर्टी फर्स्टचं स्वागत करत असताना राज्य सरकारने घालून दिले 9 नियम आणि अटी... 1. कोरोनाच्या अनुषंगाने 31 डिसेंबर 2020 रोजी दिवसभर संचारबंदी नसली तरी देखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व 1 जानेवारी 2021 रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे. 2. 31 डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतर) राहील तसंच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. 3. विशेषत: मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटीसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये देखील अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असते त्या दृष्टीने कोरोनाचा प्रादूर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. 4. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. 5. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसंच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. 6. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. तसंच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. 7. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे. 8. कोविड-19 या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पूनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. 9. तसंच या परिपत्रकानंतर 31 डिसेंबर 2020 व नूतन वर्ष सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे. अशा सूचना गृह विभागामार्फत निर्गमित करण्यात आल्या असून नागरिकांनी यांचे पालन करावे, असं आवाहन गृह विभागामार्फत करण्यात आले आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या