मुंबई, 03 जून : मुस्लिम कोरोनाबाधित रुग्णाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना का देण्यात आली अशी विचारणा भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यांच्या आरोपाला पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने जशास तसे उत्तर दिले आहे. कोरोना रुग्णांच्या आड भाजप घाणरेडे राजकारण करत आहे, अशी टीका या संघटनेनं केली. देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ट्वीट करून मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाचे एक पत्र प्रसिद्ध केले होते. या पत्रात कोरोनामुळे मुस्लिम समाजातील व्यक्तींचा मृत्यू झाल्यास त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे काम हे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाला देण्यात आले. कोरोनामुळे मुस्लिम समाजातील व्यक्तींचा मृत्यू झाल्यास दफनविधीसाठी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाला समन्वयाची जबाबदारी दिल्याबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी धक्का बसल्याचं म्हटलं होतं.
Shocked to know that @mybmc giving legitimacy to organisation like Popular Front of India (PFI), allegedly known for anti-national & anti-social activities.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 2, 2020
Hon CM @OfficeofUT ji do you agree to this?
If not, will you take strong action?
Sharing few links, See what is PFI? pic.twitter.com/KLcZoupBPh
ही संघटना देश विरोधी आणि समाज विरोधी कृत्यांसाठी ओळखली जाते, मग त्यांच्यावर ही जबाबदारी का? असा सवाल फडणवीस यांनी विचारला होता. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा प्रकार मान्य आहे का? आणि जर हे मान्य नसल्यास या प्रकरणी कोणती कठोर कारवाई करणार असा सवाल फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना विचारला होता. त्यांच्या या आरोपानंतर पीएफआय संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सय्यद युसुफ सादात यांनी संघटनेचे पत्रक प्रसिद्ध करून फडणवीसांच्या आरोपातून हवाच काढून टाकली.
दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, लॉकडाउनची घोषणा झाल्यानंतर पीएफआय संघटनेकडून कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे काम हाती घेण्यात आले होते. या कामाची सुरुवात पुणे महापालिकेकडून करण्यात आली. पुणे महापालिकेकडून पीएफआय संघटनेला तशी परवानगीही देण्यात आली. पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आहे. जर मुंबई पालिकेनं परवानगी दिली तर फडणवीसांना धक्का बसला आहे. मग पुणे पालिकेनं परवानगी दिली तेव्हा धक्का बसला नाही का? असा थेट सवाल सय्यद युसुफ सादात यांनी विचारला आहे. ‘मुंबई पालिका ही शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यामुळे शिवसेनेला बदनाम करण्यासाठी भाजपकडून घाणरेडे राजकारण करण्यात आले आणि यासाठी पीएफआय संघटनेचा वापर करण्याचा प्रयत्न करण्यात आला’, अशी टीकाही त्यांनी केली. कोरोना व्हायरसमुळे मृत झालेल्या व्यक्तीचा मृतदेह घेण्यास कुणी पुढे येत नाही. त्यामुळे आमच्या संघटनेकडून राज्यात आतापर्यंत 140 मृतदेहांची विल्हेवाट लावली आहे, असंही सादा यांनी सांगितलं. पीएफआय संघटनेवर काय आहे आरोप? पीएफआय ही संघटना केरळस्थित मुलतत्ववादी संघटना म्हणून ओळखली जाते. या संघटनेवर बंदी नसली तरीही ही केरळमधील आयसीस मॉड्यूलशी या संघटनेचे सदस्य सामील असल्याचा आरोप आहे. याचे काही सदस्य नंतर आयसीससाठी सीरिया आणि इराकलाही गेले होते. या सगळ्या कारणांमुळे पीएफआय संघटना एनआयएच्या रडारवर आहे. याशिवाय ठिकठिकाणी हिंसा भडकावणे आणि राजकीय हत्यांचा आरोपही पीएफआयवर आहे.