'लढायचं कसं ते आपल्याला माहीत आहे...', पद्मसिंह पाटलांच्या नातवाने केली पार्थ पवारांची पाठराखण

'लढायचं कसं ते आपल्याला माहीत आहे...', पद्मसिंह पाटलांच्या नातवाने केली पार्थ पवारांची पाठराखण

राज्याचं गृहमंत्रिपद राष्ट्रवादीकडे असताना पार्थ पवार यांनी ही मागणी केल्यामुळे जोरदार चर्चा झाली.

  • Share this:

मुंबई, 13 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी पक्षाच्या भूमिकेविरुद्ध जात बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. राज्याचं गृहमंत्रिपद राष्ट्रवादीकडे असताना पार्थ पवार यांनी ही मागणी केल्यामुळे जोरदार चर्चा झाली. साहजिकच पार्थ यांच्या या मागणीमुळे राष्ट्रवादीत नाराजी पसरली आणि थेट पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना खडेबोल सुनावले.

'पार्थ अपरिपक्व आहे. त्याच्या मागणीला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही,' असं म्हणत शरद पवार यांनी पार्थ यांना फटकारलं. शऱद पवार यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे सर्वांचे डोळे विस्फारले. मात्र त्यानंतर भाजप नेत्यांनी पार्थ पवार यांना समर्थन द्यायला सुरुवात केली.

'आज परत सांगतो..पार्थ.. लंबी रेस का घोडा है...थांबू नकोस मित्रा,' असं म्हणत नितेश राणे यांनी राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादावर भाष्य केलं. त्यानंतर आता पद्मसिंह पाटील यांचे नातू आणि भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे सुपुत्र मल्हार पाटील यांनीही पार्थ पवार यांचं जोरदार समर्थन केलं आहे.

'तुम्ही जन्मत: योद्धे आहात, हे मी माझ्या बालपणापासून पाहात आलोय. मला तुमचा अभिमान आहे. आम्ही उस्मानाबादमधून आहोत...आपल्याला माहीत आहे कसं लढायचं,' अशी फेसबुक पोस्ट मल्हार पाटील यांनी पार्थ पवार यांच्या समर्थनार्थ लिहिली आहे.

अजित पवारांनी पाळलं मौन

शरद पवारांनी आपल्याच कुटुंबातील सदस्याला सार्वजनिकरित्या सुनावल्यानंतर पवार कुटुंबात संघर्ष निर्माण होत असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे. त्यामुळे या सगळ्याबाबत अजित पवार नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच अजित पवार यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.

निवासस्थानाबाहेर पडल्यानंतर आज सकाळी अजित पवार यांना पत्रकारांनी पार्थवरील टीकेबद्दल प्रश्न विचारला. मात्र कोणतीही प्रतिक्रिया न देता अजित पवार निघून गेले. त्यामुळे पक्ष आणि कुटुंबातील संघर्षाबद्दल अजित पवार यांनी सध्यातरी भाष्य करण्याचं टाळल्याचं पाहायला मिळत आहे.

Published by: Akshay Shitole
First published: August 13, 2020, 4:18 PM IST

ताज्या बातम्या