'आता तुम्ही चौकशीला घाबरलं पाहिजे', संजय राऊतांनी दिले भाजप नेत्याच्या चौकशीचे संकेत

'आता तुम्ही चौकशीला घाबरलं पाहिजे', संजय राऊतांनी दिले भाजप नेत्याच्या चौकशीचे संकेत

'सुडाचे आणि बिनबुडाचे राजकारण सुरू आहे. आज पत्ते तुम्ही पिसताय पण डाव आम्ही उधळून लावू. सध्या जुनी थडगी बाहेर काढण्याचे काम सुरू आहे'

  • Share this:

मुंबई, 25 नोव्हेंबर : मनी लाँड्रिंगच्या संशयावरून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnik) यांच्या घरावर अंमलबजावणी संचानलयाने (ईडी) ने (Enforcement Directorate (ED)छापे टाकले आहे. आज ईडीकडून प्रताप सरनाईक यांना समन्सही बजावण्यात आला आहे.  त्यांच्यावर होणाऱ्या या कारवाईविरोधात शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी  'आता तुम्ही सर्वजणांनी चौकशीला घाबरलं पाहिजे, महाराष्ट्रात सुद्धा सत्ता आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत हे ही विसरू नका' असं म्हणत भाजपला गंभीर इशारा दिला आहे.

मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा प्रताप सरनाईक यांच्या प्रकरणावरून भाजपवर सडकून टीका केली आहे.

'आम्ही चौकशीला घाबरत नाही, आता तुम्ही सर्वजण चौकशीला घाबरल पाहिजे, महाराष्ट्रात सुद्धा आमची सत्ता आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, हे ही विसरू नका, चौकशीला कोण घाबरले हे लवकर कळेल', असा इशाराही राऊत यांनी दिला.

'सुडाचे आणि बिनबुडाचे राजकारण सुरू आहे. आज पत्ते तुम्ही पिसताय पण डाव आम्ही उधळून लावू. सध्या जुनी थडगी बाहेर काढण्याचे काम सुरू आहे, उत्खनन सुरू आहे. ईडीवाले मोहंजोदडो, हडप्पापर्यंत पोहोचले आहेत, काढू द्या काय काढत आहे. देशात 10 हजार कोटी घेऊन पळाले. ज्याची संपत्ती एका वर्षात वाढत आहे याकडे ईडीचे लक्ष नाही, असं म्हणत राऊत यांनी भाजपला टोला लगावला.

'कंगना रनौतने मुंबईला पाकिस्तान म्हटले होते. त्याचे समर्थन भाजपचे नेते करणार आहे का? असा सवाल विचारत संजय राऊत यांनी भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांना टोला लगावला. तसंच, 'मुंबईला उद्या कुणीही पाकव्याप्त काश्मीर असं काही म्हटलं तर मग कुणी असतील, ते  घरी असतील किंवा नसतील कारवाई होईल'  असंही राऊत म्हणाले.

सध्या सुरू असलेल्या चौकशी पूर्ण होऊ द्या. मग मी 100 ते 120 नेत्यांची नावं, ईडी आणि अर्थ मंत्रालयाला  पाठवणार आहे. मग बघतो ईडी कोणाला बोलावते, असंही राऊत म्हणाले.

'प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे की, जो तपास केला जात आहे, त्यात कुटुंबियांचा संबध नाही. मराठी माणसाने उद्योग करणं दिल्लीश्वरांना गुन्हा वाटत असेल, महाराष्ट्रातील मराठी लोकांनी व्यापार करू नये आणि करणार असाल तर केंद्रातील संस्थावापरून आम्ही तुम्हाला खत्म करू, असं जर कोणी म्हणत असेल तर हा छाताडावर उभा राहणार महाराष्ट्र आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

Published by: sachin Salve
First published: November 25, 2020, 12:21 PM IST
Tags:

ताज्या बातम्या