मुंबई, 13 मे : पाकिस्तानच्या हातातील ISI या दहशतवादी संघटनेच्या छत्रछायेखाली लपून बसलेल्या डी गॅंगच्या (D Gang) खुरापती काही संपायच्या नाव घेत नाही. दहशतवादी कारवाया करणारा दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आता राजकीय नेत्यांच्या (politicians) मुळावर उठलाय, असा धक्कादायक खुलासा NIA च्या तपासातून समोर आला आहे. जो कधी आपल्या देशाचा झाला नाही तो पाकिस्तानचा काय होणार? पण आपल्याला पाकिस्तानमध्ये लपून राहायला मिळावे यासाठी अंडरवर्ल्ड डॅान दाऊद इब्राहिम हा सतत भारता विरोधात काही ना काही तरी खुरापती करतच असतो. त्यात आता त्याचा एक नवीन कारनामा समोर आलाय. दहशतवादी कारवाया घडवून आणणारा दाऊद आता राजकीय नेत्यांना टार्गेट करत आहे. त्यात विशेष करुन हिंदूत्ववादी नेत्यांचा समावेश आहे, असा धक्कादायक खुलासा NIA च्या तपासात झाला आहे.
NIAने 9 मे रोजीच्या पहाटे मुंबईसह नालासोपारा आणि इतर असे एकूण 27 ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. यानंतर NIAने 57 लोकांना चौकशीकरता बोलावले होते. ज्यापैकी 18 जणांची NIA कसून चौकशी करत होती. त्यापैकी छोटा शकीलचे नातेवाईक आरीफ आणि शब्बीर शेख या दोघांच्या विरोधात NIAला ठोस पुरावे आढळल्याने त्यांना NIAने 13 मेच्या पहाटे अटक करुन कोर्टात हजर केले.
1993 च्या बॅाम्बस्फोट प्रकरणात आरीफ आणि शब्बीर हे दोघेही आरोपी होते. पण नंतर पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या नंतरही हे दोघे छोटा शकील मार्फत डी गॅंगच्या संपर्कात आहेत. हे अनेकदा समोर आले होते. पण देशात घातपात घडवण्यासाठी डी गॅंग रचत असलेल्या कटात हे दोघे शामिल होते, याचा खुलासा आज NIA ने कोर्टात केलाय.
(ताजमहालाविषयी मोठी बातमी! पुरातत्व विभागाने सांगितलं, 'याचिकेत म्हटल्याप्रमाणे त्या खोल्या..')
या आरीफ आणि शब्बीर यांची बहिणी ही छोटा शकीलची पत्नी आहे. त्यामुळे भाई के सगे वाले म्हणून आरीफ आणि शब्बीर त्यांच्या भागात कुप्रसिद्ध होते. NIAने फेब्रुवारी महिन्यात टेरर फंडिंग प्रकरणी FIR दाखल केली होती. तेव्हापासून हे दोघे NIA च्या रडावर होते. त्यांच्या अटकेमुळे या प्रकरणी NIAला मोठी माहिती हाती लागली आहे.
आरीफ आणि शब्बीर हे छोटा शकील मार्फत दाऊदच्या संपर्कात होते. छोटा शकील पाकिस्तानातून जे क्रिमिनल सिंडिकेट चालवतो त्या सिंडिकेटमध्ये दोन्ही आरोपी महत्वाची भूमिका बजावतात. तसेच खंडणी, अंमली पदार्थ तस्करी, दहशतवादी कृत्य यांत या दोन्ही आरोपींचा सक्रिय सहभाग असल्याचे पुरावेआढळले आहे. डी गॅंगने भारतात घातपात घडवण्याचा कट रचला होता त्यात यांची महत्वाची भूमिका होती. डी गॅंगच्या टार्गेटवर काही हिंदुत्ववादी राजकीय नेते होते तर काही इतर राजकीय नेते संपर्कात होते. त्यांची एक लिस्ट आहे ज्याची माहिती या दोघांना आहे.
हिंदूत्ववादी राजकीय नेते डी गॅंगच्या टार्गेटवर होते. तसेच इतर राजकीय नेते डी गॅंगच्या संपर्कात होते. हे कोण राजकीय नेते आहेत, तसेच दाऊद आणि छोटा शकील कुठे आहेत, त्यांचे ठिकाण शोधून काढायचे आहे, असं NIAने आपल्या कोठडी अहवालात युक्तिवाद केला. ज्यामुळे दोन्ही आरोपींना विशेष NIA कोर्टाने 20 मे पर्यंत NIA कोठडी सुनावली आहे. यामुळे आता या तपासात पुढे काय खुलासा होतो ते पाहणं महत्वाचे ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.