मुंबई, 15 मे : भारतीय पाणबुड्या, शस्त्रागारं, नौदलाची ठाणी अशी महत्त्वाची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवणारा हेर मोहम्मद हरून हाजी अब्दुल रेहमान लकडवाला याला NIA ने मुंबईतून अटक केली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणम इथल्या हेरगिरी प्रकरणी रेहमान याचं नाव पुढे आलं होतं. राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्या वेळीच लकडावाला याच्यावर गुन्हा नोंदवला होता.
लकडावाला अनेकदा पाकिस्तानला गेला होता. हेरगिरी बाबत पाकिस्तानमध्ये त्यानं विशेष ट्रेनिंग घेतल्याची माहिती NIA च्या सूत्रांनी दिली आहे. 49 वर्षाच्या या पाक हेराला अखेर मुंबईतून अटक करण्यात आली आहे.
भारतातील महत्वाच्या लष्करी ठिकाणांची खास करून नौदलाच्या पाणबुड्यांची अतिसंवेदनशील माहिती, नौदलाची ठिकाणे, शस्रागारांचे ठिकाण, यासारखी गुप्त माहिती पाकिस्तानी हेर पाकिस्तानला पोहोचवत होते. आतापर्यंत झालेल्या तपासानुसार नौदलाचे काही जण एका पाकिस्तानी नागरिकाच्या संपर्कात होते. फेसबुक, व्हाॅट्सअपसारख्या सोशल मीडियातून ते संपर्कात होते. धक्कादायक म्हणजे नौदलाशी संबंधित असलेल्यांकडूनच नौदलाची गुप्त माहिती मिळवण्याकरता हा पाकिस्तानी गुप्तहेर त्यांना पैसे देत होता.
या प्रकरणी आतापर्यंत नौदलाच्या 11 व्यक्तींसोबत एका पाकिस्तानी वंशाच्या भारतीय नागरिकत्व असलेल्या आरोपीलागी अटक करण्यात आली होती. शाइस्ता कैसर असं त्यांचं नाव आहे. मुंबईतून पकडण्यात आलेला आरोपी मोहम्मद हरून लकडावाला हा पाकिस्तानातील कराचीला बऱ्याच वेळा जाऊन आलेला आहे. कराचीला क्रॉस बॉर्डर ट्रेडच्या नावाखाली हा आरोपी त्याच्या मदतनीसांना भेटण्यास जात होता. या वेळी तो पाकिस्तानी गुप्तहेर अकबर उर्फ अली, रिजवान यांना भेटला होता. मोहम्मद हरून लकडावाला याच्या माध्यमातून नौदलाच्या 11 आरोपींच्या बँक खात्यात पैसेही भरण्यात आल्याची माहिती तपासात पुढे आली होती.