मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक, बंगळुरूतील घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची घोषणा

महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक, बंगळुरूतील घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची घोषणा

कर्नाटकातील बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याने त्याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 19 डिसेंबर : कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना (desecration of Chhatrapati Shivaji Maharaj Statue in Bengaluru) केल्याची घटना समोर आल्यावर त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. शिवप्रेमींसोबतच राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही चांगलेच आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहेत. राज्यातील विविध ठिकाणी या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीही तीव्र शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (NCP) आज संपूर्ण महाराष्ट्रात शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ट्विट करत म्हटलं, कर्नाटकात काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली आहे. याच पार्श्वभूमीवर 19 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जाऊन महाराजांना दुधाचा अभिषेक करतील.

छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक करून पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी अभिवादन करतील असंही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

वाचा : बंगळुरूत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना; तणाव वाढला

पंतप्रधानांनी गंभीर दखल घ्यावी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता  स्वतः यात लक्ष घालावे आणि तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे अशा तीव्र शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत अघटीत घडले आहे, तर त्याची कसून चौकशी करायलाच हवी. या प्रकाराकडे डोळेझाक करू नका असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, गेले कित्येक वर्ष कर्नाटकातील मराठी बांधवांवर अत्याचार केला जात आहे आणि आता तर शिवरायांसारख्या आपल्या  आराध्य दैवताची विटंबना करण्याची घटना घडते आणि तेथील सरकार याकडे डोळेझाक करते हे दुर्दैवी आहे. नुकतेच वाराणसीत काशी विश्वेश्वराच्या मंदिरात पंतप्रधानांनी आपल्या भाषणात ,  देशाची संस्कृती चिरडण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखे पराक्रमी राजे निर्माण झाले असे कौतुकोद्गार काढले होते. या कार्यक्रमास काही दिवस झाले नाही तोच, भाजप शासित कर्नाटकात याच शिवरायांची विटंबना होते, आणि कुणावर कारवाई न करता उलट मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो हे अतिशय निंदनीय आणि अवमानकारक आहे. राज्यात कुणाचेही सरकार असो पण दैवते बदलत नाहीत असे स्पष्ट शब्दांत सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, हा कानडी अत्याचार बंद करण्यासाठी आता पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने तेथील राज्य सरकारला आदेश द्यावेत व या विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यास सांगावे.

बेळगावात मराठी भाषिकांच्या गळचेपी करायची. सनदशीर मार्गाने सीमाप्रश्नी लढा देत असलेल्या मराठी भाषिकांवर कन्नड कर्मठांकडून हल्ला करायचे. असे भ्याड प्रकार थांबविण्याऐवजी त्याला खतपाणी घालायचे हे चालणार नाही. छत्रपतींचे नाव केवळ राजकारणासाठी घ्यायचे आणि आमच्या दैवताचा अनादर झाल्यावर मात्र बोटचेपी भूमिका घ्यायची. हे कदापिही खपवून घेतले जाणार नाही. मराठी अस्मितेला डिवचणे परवडणारे नाही हे ध्यानात घ्यावे. यात केंद्र सरकारनेही दुतोंडी भूमिका सोडून ठोस पावले उचलावी, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

First published:

Tags: Bengaluru, Chhatrapati shivaji maharaj, NCP