मुंबई 01 ऑक्टोबर: राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार (Parth Pawar) यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) संदर्भात घेतलेल्या भूमिकेवर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पार्थ यांनी पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेतली असंही बोललं जात आहे. त्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पार्थ यांनी सरकारच्या विरोधात भूमिका घेतलेली नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. सुळे म्हणाल्या, आरक्षणाच्या प्रश्नावर सगळ्यांनीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. सरकार मराठा आणि धनगर आरक्षणा संदर्भात आग्रही आहे. एखाद्याने आग्रही भूमिका घेतली असेल तर त्याचं स्वागत करायला पाहिजे. अशी भूमिका घेणं म्हणजे सरकारला विरोध करणे नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. काय म्हणाले पार्थ पवार? ‘विवेक सारखी तरुण मुलं आत्महत्या करत आहेत, आता तरी मराठा समाजातील नेत्यांनी जागं होऊन तत्काळ मराठा आरक्षणाबाबत लक्ष द्यायला हवं. मराठा समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी आता सुप्रीम कोर्टात जाण्याचा पर्याय किंवा अन्य विचार करावा लागेल. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायला हवा अन्यथा विवेक सारख्या अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागू शकतो आणि हेच टाळण्यासाठी राज्य सरकारनं या प्रकरणात तातडीनं लक्ष घालावं अशी मी विनंती करतो.
पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका मांडली आहे. pic.twitter.com/BB4QaXdjWM
— News18Lokmat (@News18lokmat) October 1, 2020
जय हिंद जय महाराष्ट्र असे टीव्ट करत पार्थ पवार यांनी सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्त करत इशारा दिला आहे.मराठा समाजातील युवकाने आरक्षणासाठी आत्महत्या केली, त्यानतंर या मुद्दावर पार्थ अजित पवार यांनी टीव्ट करून मराठा समाजातील नेत्यावर नाराजी सूर लावत सूचक इशारा दिला आहे. पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील नेत्यांवर बोट दाखवत पुन्हा एकदा शरद पवारांविरोधात भूमिका घेतल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. याआधी राम मंदिर, जय श्रीराम नारा देताना पार्थ पवारांनी घेतल्या भूमिकानंतर शरद पवार यांनी टीका केली होती. मात्र पार्थ पवार आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे कौटुंबिक वाद वाढला होता. आता पुन्हा एकदा पार्थ यांच्या भूमिकेमुळे आजोबा नातवामध्ये मतभेद झाल्याचं बोललं जात आहे.