मुंबई, 17 फेब्रुवारी : बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावर इतर राजकीय पक्षांना सातत्याने घेरणारा भारतीय जनता पक्षच या मुद्द्यावरून अडचणीत सापडला आहे. कारण भाजपने एका महत्त्वाच्या पदावर ज्या व्यक्तीची निवड केली आहे, तोच बांगलादेशातून येऊन अनधिकृतपणे मुंबईत वास्तव्य करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात तक्रार करण्यासाठी एका शिष्टमंडळाने गृहमंत्री अनिल देशमुख यांची नुकतीच भेट घेतली. एखादा राजकीय पक्ष आपल्या महत्त्वाच्या पदावर बांगलादेशातून भारतात घुसखोरी करणाऱ्या तरुणाला कशी संधी देऊ शकतो, असा प्रश्न राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. ‘बांगलादेशातून मुंबईमध्ये बेकायदेशीररित्या घुसखोरी करून राहणाऱ्या रुबेल शेख याला भाजपने उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभाग युवक जिल्हाध्यक्ष केल्याची माहिती पोलीस धाडीत समोर आली असून भाजपवर बांगलादेशी तरुणाला पद देण्याची नामुष्की का आली, याचे त्यांनी स्पष्टीकरण द्यावे,’ अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.
या प्रकरणाची गृहमंत्र्यांनीही गंभीर दखल घेतली असून याप्रकरणी तपास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळातही याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीकडून भाजपला टार्गेट केलं जाईल, असं दिसत आहे. याबाबत आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.