मुंबई, 06 नोव्हेंबर: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांच्याकडून मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणासह (Cruise Drugs Case) इतर सहा महत्त्वाची प्रकरण काढून घेतल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगली आहे. समीर वानखेडे यांच्या ताब्यातील प्रकरणं एनसीबीचे अधिकारी संजय कुमार सिंह (Sanjay Kumar Singh) यांच्या हातात दिल्याची देखील चर्चा आहे. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांनी शुक्रवारी (5 नोव्हेंबर 2021) माध्यमांसमोर स्पष्टीकरण दिलं.
'मला या प्रकरणांच्या तपासातून बाहेर काढण्यात आलेलं नाही. या प्रकरणाची केंद्रीय एजन्सीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी लेखी याचिका मीच न्यायालयात दाखल केली होती. त्यामुळे आता आर्यन खान प्रकरण आणि समीर खान प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबीच्या विशेष तपास पथकाकडून केला जाणार आहे. या पथकामध्ये दिल्ली आणि मुंबईच्या एनसीबीमधील अधिकाऱ्यांचा समन्वय असणार आहे,’ अशी माहिती वानखेडे यांनी दिली. याशिवाय एनसीबीनंसुद्धा संजय सिंह यांच्या सहीनं एक अधिकृत पत्रक काढलं आहे. एनसीबीनं कुठल्याही तपास अधिकाऱ्याकडून तपास काढून घेतलेला नाही, असं या पत्रकात म्हटलं आहे. एनसीबी संपूर्ण देशभरात एकीकृत एजन्सी म्हणून काम करते. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत दोन्ही एनसीबी अधिकारी एकमेकांच्या मदतीनं काम करणार आहेत, असं ट्विट एएनआयनं केलेलं आहे.
कोण आहेत संजय सिंह?
दरम्यान, ड्रग्ज प्रकरणात नव्यानं एन्ट्री झालेले अधिकारी संजय सिंह कोण आहेत? याबाबत अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण झालं आहे. 1996च्या बॅचचे पासआऊट असलेले संजय सिंह ओडिशा केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते एनसीबीमध्ये डेप्युटी डायरेक्टर जनरल(ऑपरेशन्स) पदावर आहेत. एनसीबीमध्ये येण्यापूर्वी संजय सिंह सीबीआयमध्ये उपमहानिरीक्षक पदावर कार्यरत होते. संजय कुमार सिंह यांनी ओडिशातील अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचंही नेतृत्व केलेलं आहे. त्यानंतर त्यांना सीबीआयमध्ये नियुक्ती मिळाली. सीबीआयमध्ये असताना त्यांनी 2010 च्या कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या टीमचंही नेतृत्व केलं होतं. आता ते मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणासह इतर सहा प्रकरणांचा तपास पाहणार (एनसीबीच्या म्हणण्यानुसार तपासात सहकार्य करणार आहेत) आहेत. यातील बहुतांश प्रकरणं बॉलिवुडशी संबंधित आहेत.
दरम्यान, आता संजय कुमार सिंह यांची या प्रकरणांमध्ये एन्ट्री झाली आहे. त्यामुळे वानखेडे यांच्याकडून तपास काढून घेतल्याची जोरदार चर्चा रंगली. एनसीबीनं, समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील एजन्सीच्या मुंबई प्रादेशिक युनिटमधील आर्यन खानचा समावेश असलेल्या क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास परत घेतला आहे. एनसीबीनं क्रूझ प्रकरण आणि मुंबई युनिटमधील इतर पाच प्रकरणं दिल्लीतील एका विशेष तपास पथकाकडं (SIT) सोपवल्याची माहिती उघड झाली होती. सूत्रांनी न्यूज18 ला दिलेल्या माहितीनुसार, अशी जवळपास 6 प्रकरणं आहेत ज्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील ड्रग्स रॅकेटचा देखील समावेश आहे. या बाबी संवेदनशील आहेत. यातील ड्रग्जशी संबंधित दोन प्रकरणांचे मुंबई, ठाणे आणि काश्मीरमध्ये धागेदोरे आहेत. 'दहशतवादी फंडिंग लिंक्समुळे' या प्रकरणांचा तपास संवेदनशील असल्यानं वानखेडेंकडून तपास काढून घेतल्याचं सूत्रांचं म्हणणं होतं.
हेही वाचा- ठाणे: पत्ते खेळणाऱ्यांना हटकल्याने बापलेकास बेदम मारहाण; लोखंडी रॉडने केले वार
एनसीबीचे उपमहासंचालक (उत्तर-पश्चिम विभाग) मुथा अशोक जैन यांनी सांगितलं होतं की, हे सर्व फेरबदल 'प्रशासकीय आधारावर' करण्यात आले आहेत. मुंबई युनिटच्या ताब्यात असलेल्या सहा प्रकरणांमध्ये 'व्यापक आणि आंतरराज्यीय, गोष्टींचा समावेश असल्यानं दिल्लीतील युनिटला यामध्ये बोलवण्यात आलं आहे. एनसीबीच्या ऑपरेशनल युनिटचं संपूर्ण भारतात कार्यक्षेत्र आहे आणि सध्या त्याचे प्रमुख डीडीजी संजय कुमार सिंह आहेत. मुंबईतील प्रकरणांमध्ये जरी दिल्ली युनिटची एन्ट्री झाली असली तरी मुंबई झोनच्या संचालकपदी समीर वानखेडेच राहतील, असं देखील जैन यांनी स्पष्ट केलं आहे.
अभिनेत्री रिया चक्रवर्तीशी संबंधित असलेल्या 2020मधील अंमली पदार्थ प्रकरण कुठे आहे, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. हे प्रकरण सुद्धा मुंबई युनिटमधून दिल्लीच्या ऑपरेशन युनिटरकडे दिल्याची चर्चा आहे.
हेही वाचा- केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्याचा अपघात, तीन गाड्यांची एकमेकांना धडक; 2 जखमी
समीर वानखेडे आणि एनसीबीनं त्यांच्याकडून तपास पूर्णपणे काढून घेतल्याच्या वृत्तांचं खंडन केलं असलं तरी मंत्री नवाब मलिक यांनी तपास काढून घेतल्याचं ठामपणे सांगितलं आहे. 'आर्यन खान प्रकरणासह पाच प्रकरणांतून समीर वानखेडे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. एकूण २६ प्रकरणं आहेत ज्यांची चौकशी करणे आवश्यक आहे. ही फक्त सुरुवात आहे... सिस्टिम ठीक करण्यासाठी अजून बऱ्याचं गोष्टी कराव्या लागतील आणि आम्ही त्या करू, असं राष्ट्रवादीचे नेते मलिक शुक्रवारी म्हणाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aryan khan, NCB