मुंबई, 8 मे : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांना आज लीलावती रुग्णालयातून (Lilavati Hospital) डिस्चार्ज मिळाला. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) सडकून टीका केली. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत (BMC Election 2022) आपण शिवसेनेच्या विरोधात प्रचाराच्या मैदानात उतरणार, अशी घोषणा नवनीत राणा यांनी यावेळी केली. विशेष म्हणजे नवनीत राणा यांनी यावेळी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आव्हान दिलं. उद्धव ठाकरेंनी हिंमत असेल तर आपल्या विरोधात लढून निवडणूक जिंकून दाखवावी, असं खुलं आव्हान नवनीत राणा यांनी दिलं. नवनीत राणा नेमकं काय म्हणाल्या? “येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राची जनता, रामभक्त आणि हनुमान यांना माणणारे जेवढे नागरीक आहेत ते शिवसेनेला त्यांची जागा दाखवतील. मी उद्धव ठाकरेंना चॅलेंज करते, तुमच्यामध्ये दम असेल तर तुम्ही लोकांमध्ये या. लोकांमध्ये निवडून दाखवा. त्यांनी मतदारसंघ निवडावा. पूर्ण महाराष्ट्रात त्यांना जो मतदारसंघ वाटतो त्या मतदारसंघात त्यांनी उभं राहावं. त्यांच्याविरोधात आम्ही स्वत:च्या मेहनतीवर निवडून येऊ. तेव्हा त्यांना माहिती पडेल की जनताची ताकद काय असते”, असा घणाघात नवनीत राणा यांनी केला. ( ‘यायलाच पाहिजे..!’, मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी शिवसेनेचा जबरदस्त टीझर; क्षणात Video Viral ) “मुंबई महापालिका जी दोन पिढ्यांपासून यांच्याकडे आहे. पण येणाऱ्या काळात मुंबईची जनता आणि रामभक्त त्यांना त्यांची जागा दाखवणार आहेत. मी पूर्ण ताकदीने मुंबई महापालिकेसाठी काम करणार. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने भ्रष्टाचाराची लंका शिवसेनेने उभारली आहे ते आम्ही नष्ट करणार. ही लंका संपविण्यासाठी पालिका निवडणुकीत पूर्ण ताकद लावणार. मी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेविरोधात प्रचारासाठी येणार आहे. मी मुंबईची मुलगी आहे. मुंबईच्या जनतेला न्याय देण्यासाठी, विकास होण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला संपविण्यासाठी पूर्ण ताकदीने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत प्रचारसाठी उतरेन आणि जे रामभक्त आहेत त्यांना पाठिंबा देईन. भ्रष्टाचारी लंकेला मिटविण्यासाठी जिथे गरज लागेल तिथे मी प्रचार करणार”, असा एल्गार नवनीत राणा यांनी केला. “डॉक्टरांनी रिक्वेस्ट केलेली. अजूनही माझे बरेचसे चेकअप बाकी आहेत. जेलमध्ये 14 दिवस माझ्यासोबत झालं ते बघता माझ्या प्रश्न आहे, एका महिलेसोबत झेलमध्ये एवढा मोठा अत्याचार, माझा एक प्रश्न आहे की, मी नेमकं काय केलं होतं? मी अशी कोणती चूक केली? रामाचं आणि हनुमानाचं नाव घेणं हे त्यांना चूक वाटत असेल. त्यासाठी त्यांनी मला 14 दिवस जेलमध्ये टाकलं. त्यांना मी सांगू इच्छिते, हनुमान आणि श्रीरामाचं नाव घेणं चुकीचं आहे तर त्यासाठी मी 14 दिवस काय 14 वर्षे जेलमध्ये राहायला तयार आहे. मला कुणी दाबण्याचा प्रयत्न करु नये”, असं नवनीत राणा म्हणाल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.