Home /News /mumbai /

काँग्रेस महाविकास आघाडी सरकारमधून पाठिंबा काढणार? नाना पटोलेंचं स्पष्ट विधान

काँग्रेस महाविकास आघाडी सरकारमधून पाठिंबा काढणार? नाना पटोलेंचं स्पष्ट विधान

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस व्यथित होवून या सरकारमधून पाठिंबा काढणार असल्याची चर्चा सुरु आहे. पण त्याबाबत अशी अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

    मुंबई, 23 जून : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार सध्या संकटात सापडलं आहे. या संकटसमयी शिवसेनेच्या सत्तापक्षातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मित्रपक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून ऑनस्क्रिन तसेच विधानं केली जात आहेत. पण आतमध्ये सुरु असलेल्या खलबत्यांमधून वेगळीच माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस व्यथित होवून या सरकारमधून पाठिंबा काढणार असल्याची चर्चा सुरु आहे. पण त्याबाबत अशी अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या कदाचित उलटसुलट चर्चा असू शकतात. विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वत: महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं विधान केलं आहे. त्यामुळे या सरकारची दिशा नेमकी कोणत्या बाजूला चालली आहे ते अद्याप समजू शकलेलं नाही. काँग्रेसची आज सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. "सध्याचं राजकीय महाभारत शमलं पाहिजे. या अस्थिर परिस्थितीमुळे राज्याचं नुकसान होत आहे. हे थांबलं पाहिजे, अशी भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. महाविकास आघाडीचं सरकार हे कायम राहण्याच्या दृष्टीकोनाने आमचे विचारमंथन झाले आहे. संजय राऊतांच्या विधानावर चर्चा झाली. एक रणनीतीच्या आधारावर चर्चा झाली. भाजपने पक्षात फुट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. ते संकट दूर करण्यासाठी संजय राऊतांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातून त्यांनी तसं विधान केलं आहे", असं नाना पटोले म्हणाले. (राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमधून पाठिंबा काढणार? महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या भूकंपाची शक्यता) "महाविकास आघाडीचं सरकार हे पाच वर्ष कायम राहील. काँग्रेस महाविकास आघाडीत आहे, राहणार आणि त्याबाबत दुमत नाही", असं नाना पटोले रोखठोकपणे म्हणाले. "राज्यपाल यांचंही लक्ष आहे. महाराष्ट्रात समजा अल्पमतात सरकार आलेलं आहे तर राज्यपाल कोणाचं ऐकतात हे काही वेगळं सांगायची गरज नाही. अजूनही भाजप पुढे का येत नाही? ज्यांनी महाराष्ट्रात हा सत्ता संघर्ष आणि राजकीय अस्थितरता निर्माण केली त्यांच्याजवळ अजूनही बहुमताचे आकडे आलेले नाहीत. पण पहाटेचं सरकार पडल्यापासून राज्यात अस्थितरता तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यांनी हा मोठा भूकंप आणला. आकडे अजूनही उद्धव ठाकरे सरकारच्या बाजूने आहेत", असा दावा नाना पटोले यांनी केला.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या