मुंबई, 8 जून : राज्यातील मुंबईतील वाढती कोरोनाबाधितांची संख्या ही चिंता वाढवणारी आहे. कोरोना बाधितांची संख्या कशी कमी करता येईल यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. यातच एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी, धारावी एकेकाळी कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट होती, परंतु आता गेल्या सात दिवसांपासून येथे कोरोना संसर्गामुळे एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. याशिवाय कोविड -19 च्या संख्येतही घट आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) च्या अधिकृत आकडेवारीनुसार 1 जून रोजी धारावी येथे कोरोना विषाणूचे 34 रुग्ण नोंदविले गेले होते, तर 7 जून रोजी एकूण 13 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी 6 जूनला 10, 5 जूनला 17 आणि 4 जून रोजी 23 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार धारावीमध्ये कोविड -19 च्या रुग्णांमध्ये घट होत असल्याचे दिसून येत आहे. 7 जूनपर्यंत धारावीमध्ये एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1,912 होती. 30 मे पासून धारावीत कोरोनामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. ही मोठी दिलासादायक बातमी आहे.
धारावीच्या कोरोना मिशनचे प्रभारी बीएमसीचे सहाय्यक महानगरपालिका आयुक्त किरण दिघावकर म्हणाले, “धारावीतील कडक तपासणीमुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत झाली आहे. बीएमसीचे आरोग्य कर्मचारी, खासगी दवाखाने, मोबाइल व्हॅन, महानगरपालिकेचे दवाखाने इत्यादींनी सुमारे सहा ते सात लाख लोकांची घरोघरी चौकशी केली. ते म्हणाले, "आम्ही ताप, ऑक्सिजनची पातळी आणि इतर लक्षणे असलेल्या जास्तीत जास्त लोकांच्या तपासणीसाठी काम केले आणि त्यांना वेगळे केले. आम्ही सतत चाचण्या घेतल्या. ”बीएमसीकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार धारावीची लोकसंख्या 8.5 लाख आहे.
परिसरातील एकूण 8,500 लोकांना विविध ठिकाणी सरकारी क्वारंटाईन केंद्रात ठेवण्यात आलं. महानगरपालिकेने 4000 लोकांची तपासणी केली आहे, तर धारावी येथे उभारलेल्या तापाच्या शिबिरांत 1350 जणांची चाचणी घेण्यात आली.
हे वाचा-कुख्यात गुंडाला भररस्त्यात गोळ्या घालून केलं ठार; 7 दिवसांनी होतं लग्न
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india, Dharavi