धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 3 मार्च : छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. त्यांचा गौरवशाली इतिहास आज आपण त्या काळातील गड किल्ले आणि शस्त्रांच्या रूपाने जगतोय. इतिहासप्रेमींना शिवकालीन ऐतिहासिक शस्त्रे, शिवकालीन भाषा, नाणी, चित्र पाहता यावीत या उद्देशाने मुंबईतील कुर्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा समितीने प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनास शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आपला कट्टा ही संस्था गेल्या बारा वर्षांपासून शस्त्र, नाणी, शिवकालीन पत्र गोळा करून शालेय विद्यार्थी तसेच येणाऱ्या तरुण पिढीला शस्त्रांबद्दल माहिती व्हावी इतिहास त्यांना कळावा यासाठी प्रयत्न करत आहे. संस्थेकडे तलवारी, कट्यारी, जांबिया, भाले, बचीर्, ढाली, वाघनखे, गुप्ती, जिरेटोप, जांबिए, खंजीर, कुऱ्हाडी, मुठी, तोफगोळे, धनुष्यबाण आदींचा समावेश आहे. त्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळी चलनात असलेली नाणी, मोडी लिपी मधील पत्र, ग्रंथ प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे. त्याच बरोबर महाराजांनी नौदल सैन्य उभारल त्या संदर्भात माहिती या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
उस्फूर्त प्रतिसाद छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील शिव शस्त्र, नाणी, आरमाराची माहिती, शिवकालीन पत्र, ग्रंथ, त्याकाळातील खेळ प्रदर्शनात मांडण्यात आले आहे. पहिल्यांदाच कुर्ल्यात भव्य प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन दोन दिवसीय आहे. या प्रदर्शनात कुर्ल्यातील विविध शाळेतील मुलं, स्थानिक रहिवाशी, शिवप्रेमी, महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा समितीचे सदस्य सुनील यादव यांनी सांगितले.
स्वराज्यातील किल्ल्यांसाठी शिवाजी महाराजांनी लिहिलेलं दुर्मीळ पत्र! पाहा Photos
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकालीन इतिहासाचा उलगडा या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांना शस्त्र चालवण्यात पारंगत का म्हणतात. या शस्त्रांचं काय महत्व आहे. हे शस्त्र लोकांपर्यत पोहचावे यासाठी प्रयत्न सुरू आहे. याच बरोबर गड किल्ल्यांवरती, लेण्यांवरती काही खेळ कोरले आहेत. त्याकाळातील खेळ त्याची प्रतिकृती या खेळांच महत्त्व काय आहे. मोक्षपट, कवडी, सारीपाट असे विविध खेळ इथे ठेवण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकालीन इतिहासाच एक दालन इथे कुर्ल्यात नागरिकांसाठी खुले आहे, असं आपला कट्टा संस्थेचे पंकज भोसले यांनी सांगितले.

)







