मुंबई, 6 जानेवारी : मुंबईत कोरोनाचा प्रचंड उद्रेक बघायला मिळतोय. विशेष म्हणजे मुंबईत काल कोरोना रुग्णसंख्येने 15 हाजारांचा टप्पा पार केला होता. पण आज हाच आकडा थेट 20 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे प्रशासनासह मुंबईकरांची धाकधूक वाढली आहे. विशेष म्हणजे मुंबईची प्रसिद्ध झोपडपट्टी असलेल्या धारावी परिसरात कोरोनाबाधितांचा आजचा आकडा थेट 100 च्या पार गेलेला आहे. त्यामुळे प्रशासनापुढील मोठे आव्हानं उभी राहिली आहेत. मुंबईत आज दिवसभरात तब्बल 20 हजार 181 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी 17 हजार 154 रुग्णांमध्ये सध्यातरी कोणतेही लक्षणे दिसत नाहीयत. तर दिवसभरात 1 हजार 170 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईत आज दिवसभरात चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर 2 हजार 837 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील पॉझिटिव्हीटी दर हा थेट 30 टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील प्रचंड प्रमाणात वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे लक्षणे नसलेल्या बाधितांची संख्या कालपर्यंत 87 टक्के होती, पण हीच आकडेवारी आज थेट 85 टक्क्यांच्या खाली गेली आहे. तसेच मुंबईतील एकूण बेड्सच्या आकडेवारीपैकी 16.8 बेड्स हे आज भरले आहेत. येत्या काळात रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर प्रशानापुढील आव्हानं आणखी वाढत जातील. हेही वाचा : मुंबईला चहुबाजूंनी कोरोनाने घेरलं, ठाणे मंडळात तब्बल 30 हजार 312 नवे कोरोनाबाधित महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती कधी निस्तारेल? महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर राहुल पंडित यांनी न्यूज 18 लोकमतला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी ही परिस्थिती सुधारावी यासाठी काय उपाययोजना करता येतील, या विषयी माहिती दिली. “नागरिकांनी जबाबदारीने वागले, गर्दी कमी केली, मास्क वापरलं तर आपण कोरोनाची ही लाट नियंत्रणात आणू शकतो. पण तसं घडताना दिसत नाहीय. बरेचजण अजूनही मास्क वापरताना दिसत नाहीय. ओमायक्रोन मास्क घेतलेल्यांनाही होतोय. त्यामुळे काळजी घेतली तर त्याची तीव्रता करता येईल”, असं राहुल पंडित यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील विविध शहरं आणि जिल्ह्यांमधील आजची आकडेवारी चिंता वाढवणारी, आजची आकडेवारी वाचा : यवतमाळ जिल्ह्यात आज 34 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, 6 महिन्यातील सर्वात जास्त रुग्ण संख्या, वाढत्या रुग्ण संख्येने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वाशिम जिल्ह्यात आज एकाच दिवशी नवे 14 कोरोना रुग्ण आढळले, प्रशासनाची चिंता वाढली बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक, एकाच दिवशी 23 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. कोरोनामुक्तीकडे जात असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक बघायला मिळतोय. विशेष म्हणजे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांना कोरोनाची लागणा झालीय. एकेकाळी बुलडाणा जिल्हा हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत असताना तिसऱ्या लाटेत बुलडाणा जिल्ह्यात आज 23 कोरोना पोजेटीव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे त्यामुळे आता कोरोना च्या तिसऱ्या लाटेचा बुलडाणा जिल्ह्यात ही सुरवात झाली असून शासनाने आखून दिलेल्या त्रिसूत्री नियमाचे पालन करणे गरजेचे झाले आहे कोरोनामुक्तीकडे बुलडाणा जिल्हा जात असताना जिल्हा वाशीयांनी कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन सुरू केले होते. ना कुठं मास्क ना कुठं सोशल डिस्टनसिंग, त्यामुळे कोरोनाचा शिरकाव हा बुलडाणा जिल्ह्यात झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 87621 इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 676 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर आज रोजी 54 कोरोना रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत. अमरावतीत कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. अमरावतीत आज दिवसभरात कोरोनाचे 64 रुग्ण आढळले. जिल्ह्यात सध्या 212 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी शहरातील 174 आणि ग्रामीण भागातील 38 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 96428 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. ठाणे : कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहेत. मुंबई, पुण्यापाठोपाठ ठाण्यातही कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट होताना दिसतोय. विशेष म्हणजे ठाणे शहरात आज दिवसभरात तब्बल 2500 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. नव्या कोरोनाबाधितांचा एकाच दिवसात वाढणारा हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. त्यामुळे ठाण्यात कोरोना नव्या रुग्णसंख्येने पहिल्या-दुसऱ्या लाटेचाही रेकॉर्ड मोडल्याचे दृश्य आहे. भिवंडी शहरात आज 68 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर दोन रुग्णांनी आज कोरोनावर मात केली. शहरात सध्या 181 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरात आतापर्यंत एकूण रुग्ण 11102 आढळले आहेत. तर आतापर्यंत एकूण 10443 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच 478 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्य झाल्याची नोंद आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत आज प्रचंड मोठी वाढ झाली आहे. चंद्रपुरात काल दिवसभरात 31 नवे रुग्ण आढळले होते. पण आज हाच आकडा थेट 41 वर पोहोचला आहे. तर जिल्ह्यातील आज फक्त एका रुग्णाने कोरोनावर मात केली. सध्या 100 रुग्णांवर उपचार सुरु आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1545 जणांचं कोरोनाने निधन झालंय. तर 88985 नागरिकांना कोरोनाची लागण झालीय. यापैकी 87340 जणांनी कोरोनावर मात केली आहे. रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातदेखील कोरोनाचा उद्रेक सुरु आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 100 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सक्रिय करोनोबाधित रुग्णांची संख्या ही 315 वर पोहोचली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत 79 हजार 494 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 2 हजार 492 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत अचानक झालेली वाढ चिंताजनक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.