मुंबई 23 सप्टेंबर: गेल्या 24 तासांपासून मुंबई आणि परिसराला झोडपणाऱ्या पावसाने सर्व विक्रम मोडले आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई तुंबली असून कोरोनाशी लढणाऱ्या मुंबईचा वेग आणखी मंदावला आहे. 39 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी 23 सप्टेंबर 1981रोजी मुंबईत विक्रमी 318.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर आज (23 सप्टेंबर 2020) 286.4 एवढ्या पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.
सप्टेंबर महिन्यात जेवढा पाऊस होतो तेवढा एका दिवसात 80 टक्के पाऊस झाला असं मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यांनी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाला भेट देऊन आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, मुंबईत पावसाचा धुमाकूळ सुरूच असताना हवामान खात्याने पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई आणि किनारपट्टीच्या परिसरात पुढचे 24 तास हे मुसळधार पावसाचे असतील असं या अलर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. मंगळवारी रात्री विक्रमी पाऊस झाल्याने मुंबईत जागोजागी पाणी तुंबलं होतं. त्याचा आता कुठे निचरा सुरू झालेला असतांनाच हा नवीन इशारा आल्याने प्रशासनाचाही झोप उडणार आहे.
All Time Record for Mumbai Scz Rainfall in September is 318.2 mm on 1981, Sept 23. Today on Sept 23, Scz recorded 286.4 mm Last 10 year's Sept Month 24 hrs highest RF is summarised below with date of occurance in bracket. Last Column. pic.twitter.com/hRT2VKWpmU
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 23, 2020
या पावसात वाहतुकीचे तीन तेरा वाजले असून ठिक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाचा जोर वाढला असून पुढचे ती दिवस असेच वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
रात्रभरापासून मुंबई-ठाणे, नवी मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचं धुमशान सुरू आहे. संध्याकाळपासून सुरू असलेल्या पावसानं रात्री जोर धरला आणि मुंबईकरांची दाणादाण उडाली. लोकल सेवा पासून रस्त्याच्या वाहतुकीपर्यंत आणि दुकानांपासून ते घरापर्यंत अनेकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सखल भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक खोळंबली तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची झोप उडाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IMD FORECAST, Mumbai rain