Home /News /mumbai /

भयंकर मुंबई! दळण आणायला गेलेली आई परतलीच नाही! घाटकोपरला गायब झालेल्या महिलेचा मृतदेह सापडला हाजीअलीला

भयंकर मुंबई! दळण आणायला गेलेली आई परतलीच नाही! घाटकोपरला गायब झालेल्या महिलेचा मृतदेह सापडला हाजीअलीला

दळण आणायला म्हणून बाहेर पडलेली दोन चिमुरड्यांची आई अचानक बेपत्ता झाली आणि मुंबईच्या उघड्या गटारीमुळे पावसाळ्यातला आणखी एक बळी ठरली.

    मुंबई, 6 ऑक्टोबर :  मुंबईत प्रत्येक पावसाळ्यात पाणी तुंबण्याची बातमी येते आणि या साठलेल्या पाण्यात दडलेल्या उघड्या गटारींमुळे काही मृत्यू होतातच. शहराची ड्रेनेज व्यवस्था योग्य असल्याचे कितीही दावे केले तरी उघड्या गटारींमुळे बळी जात असतात. काही तासांच्या पावसाने ध्यानीमनी नसताना दोन चिमुकल्यांच्या आईचा बळी घेतला, हे वाचून अंगावर काटा येईल. घाटकोपरला राहणारी ही महिला दळण आणायला म्हणून बाहेर पडली आणि अचानक बेपत्ता झाली. तिचा मृतदेह दोन दिवसांनी कित्येक किलोमीटर दूर हाजीअली इथल्या समुद्रकिनारी सापडला. ही भीषण घटना घडली घाटकोपरच्या असल्फा परिसरात घडली. इथल्या आशापुरा सोसायटीत राहणाऱ्या शीतल भानुशाली या 32 वर्षीय महिलेचा या घटनेत बळी गेला आहे. शनिवारी संध्याकाळी मुंबईच्या काही भागात मुसळधार पाऊस झाला. थोडा पाऊस कमी होत असतानाच दळण आणायला म्हणून शीतल जवळच्याच गिरणीत निघाल्या. पण बराच वेळ झाला नाही, म्हणून घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. गिरणीतून त्या दळण घेऊन निघाल्याचं कळलं. त्यावेळी पतीने आणखी काही ठिकाणी चौकशी केली. शेवटी रस्त्यावरचं पाणी ओसरलं तेव्हा त्यांना एका उघड्या गटारीजवळ दळणाची पिशवी दिली. त्यामुळे पत्नी याच गटारीत पडली असावीस असा संशय आला. पती जितेश भानुशाली यांनी तत्काळ अग्निशमन दल आणि पोलिसांना खबर दिली. या गटारीत रात्री उशिरापर्यंत आणि रविवारीही जवानांनी शोधाशोध केली पण शीतल यांचा पत्ता लागला नाही. अखेर सोमवारी सकाळी थेट हाजीअलीजवळ समुद्रकिनाऱ्यापाशी शीतल यांचा मृतदेह सापडला. दोन चिमुरडी झाली आईविना पोरकी शीतल भानुशाली या पती जितेश आणि दोन मुलांसह असल्फा भागात राहत होत्या. आता त्यांच्या मागे 8 वर्षांचा यश आणि फक्त 2 वर्षांची मुलगी ध्वनी आहे. जितेश एका कापडाच्या फॅक्टरीत काम करतात. घरची परिस्थिती सामान्य आहे. आता हे चौकोनी कुटुंब विस्कटल्याबद्दल जाब कुणाला विचारणार असा संतप्त सवाल घाटकोपर परिसरातले नागरिक विचारत आहेत. घाटकोपरस परिसरातल्या नागरिकांनी मुंबई महापालिकेच्या स्थानिक अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. काहीही कारण नसताना निष्पाप नागरिकांचा महानगरीत बळी जाईपर्यंत प्रशासन ढिम्म हलत नाही, हेच या घटनेवरून दिसतं. या घटनेची दखल घेत मुंबई महापालिकेने उपायुक्तांना 15 दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Ghatkopar, Mumbai

    पुढील बातम्या