पनवेल, 26 नोव्हेंबर : पनवेलजवळ मध्यरात्रीच्या सुमारास लालपरीला भीषण अपघात झाला आहे. मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर रात्री उशिरा पनवेलपासून 9 किमी अंतरावर भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की त्यामुळे लालपरीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. भरधाव अज्ञात वाहनानं एसटीला जोरदार धडक दिली.
मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास एसटी बसला अज्ञात वाहनाची धडक लागल्याने गंभीर अपघात झाला. ही धडक एवढी भीषण होती की बसमधील आसन व्यवस्था तसेच एका बाजूचा बसचा पत्रा पूर्णपणे निखळला. या अपघातात बसमधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून 15 प्रवासी गंभीर जखमी आहेत.
बसमधील प्रवाशांन पैकी जवळपास 15 प्रवाशांना हात पाय डोके तसेच तोंडाला गंभीर मार लागला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. घटनास्थळावरून जखमींना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या एसटी बस महामार्गावरून हटविण्यात आली असून महामार्ग पोलीस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.
हे वाचा-'एक मूल कुशीत घट्ट धरलेलं असतानाच मला कळलं, मी दुसरं गमावलंय'...
अज्ञान वाहनानं दिलेली धडक इतकी भयंकर होती की त्यामुळे लालपरीच्या एका बाजूचा पत्रा पूर्णपणे निखळला तर सीट्स देखील निखळून आल्या आहेत. महामार्ग पोलीस देवदूत यंत्रणा लोकमान्य रुग्णालय रुग्णवाहिका यांनी वेळीच मदत कार्य करत तातडीने सर्व रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान या अपघातात जखमी झालेल्या 15 जणांवर सध्या उपचार सुरू असून पोलीस या अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत. पोलिसांकडून सध्या या प्रकरणी चौकशी सुरू आहे.