मुंबई, 26 ऑक्टोबर : भावी मुख्यमंत्री! असे पोस्टर झळकल्यानंतर आता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नावाचे आणखी काही पोस्टर्स वरळीमध्ये लावण्यात आले आहेत. शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर शिवसेनेकडून संपूर्ण वरळीमध्ये विजयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. ‘Young Soch Wins’ असे पोस्टर संपूर्ण वरळी परिसरात लावण्यात आले आहेत. या पोस्टरमध्ये इंग्रजीतून शिर्षक देत आदित्य ठाकरे हे तरुणांच्या विचारांती नेते असल्याचं शिवसेनेनं हायलाईट करण्यास सुरुवात केली आहे.
Mumbai: Posters put up by Shiv Sena in Prabhadevi, following Aditya Thackeray's victory in #MaharashtraAssemblyPolls He won from the Worli assembly constituency by a margin of 67,427 votes. pic.twitter.com/thjd7fzI5s
— ANI (@ANI) October 25, 2019
विधानसभेचा निकाल लागल्यानंतरही भावी मुख्यमंत्री असं लिहित वरळी आदित्य ठाकरेंच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले होते. पोस्टरवर आदित्य यांच्या फोटोसोबतच शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो होता. ‘शिवसेनेचे युवा नेते आणि महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे यांनी विजयाच्या हार्दिक शुभेच्छा…’ असा संदेश पोस्टर लिहिला होता. आदित्य ठाकरे यांचा 70 हजार 191 मतांनी दणदणीत विजय झाला. आघाडीचे उमेदवार सुरेश माने यांचा आदित्य यांनी दारूण पराभव केला. तर बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमधील वादग्रस्त स्पर्धक अभिजीत बिचुकले यांनीही थेट आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. दरम्यान, सुरेश माने यांना 15296 मते तर बिचुकले यांना 647 मते मिळाली.
निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन जनतेचे आभार मानले होते. मात्र, आभार मानतानाच भाजपलाही त्यांनी टोलाही लगावला. सत्ता येते आणि जातेही, पण सत्तेची नशा कोणाच्या डोक्यात शिरली तर जनता ती उतरवते, असे सांगताना उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी ठरलेल्या 50-50 टक्क्यांच्या फॉर्म्युल्याची आठवणही करून दिली. दोनही पक्षांचे ज्येष्ठ नेते एकत्र बसतील. पारदर्शकपणे चर्चा करतील आणि तोडगा काढतील असेही त्यांनी सांगितले. आधी सत्तेचे वाटप ठरेल नंतरच सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल, असेही उद्धव यांनी स्पष्ट केले. हा भाजपला इशारा नसून लोकसभेच्या वेळी जे ठरले त्याची फक्त आठवण करून देतो, असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे म्हणाले, कुणाही एका व्यक्ती किंवा पक्षाभोवती प्रचार केंद्रीत राहू नये. जनतेनं अत्यंत जागरूकपणे मतदान केलंय. त्यांनी विरोधी पक्ष जिवंत ठेवलाय. काही जण गृहीत धरून चालतात त्यांनाही जनतेनं योग्य तो संदेश दिलाय असा टोलाही त्यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे लगावला. सत्ता स्थापनेही मला घाई नाही असंही त्यांनी सांगितलंय. भाजपने जागावाटपावेळी अडचण आहे म्हणून सांगितलं. मात्र प्रत्येकवेळी भाजपच्या अडचणी समजून घेऊ शकत नाही असंही ते म्हणाले. गरज पडली तर अमित शहाही चर्चेला येतील असेही ते म्हणाले.

)







