मुंबई, 19 ऑगस्ट : बॉलिवूड (Bollywood) अर्थात हिंदी चित्रपटसृष्टीचं केंद्र असणाऱ्या मुंबईत (Mumbai) स्टार, हिरो बनण्याचं स्वप्न घेऊन दररोज अनेकजण येत असतात. यातूनच अनेकांची चित्रपटात काम मिळवून देण्याचं आमिष दाखवून फसवणूक केली जाते. चित्रपटाच्या ऑडिशानच्या नावाखाली मुलींना काहीही करण्यास भाग पाडलं जातं. अशा अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि टीव्ही स्टार्सचे अश्लील व्हिडीओ बनवून त्यांना ब्लॅकमेल करण्याचं एक मोठं सेक्स्टॉर्शन रॅकेट (Sextortion Racket) मुंबई पोलिसांनी उघडकीस आणलं आहे. 100 पेक्षा जास्त बॉलिवूड सेलिब्रिटी आणि टीव्ही स्टार्स या रॅकेटला बळी पडले असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. बॉलिवूड स्टार शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याच्या अटकेमुळे नुकतंच पॉर्नोग्राफीचं प्रकरण उघडकीस आल्याच्या धक्क्यातून अजून बॉलिवूड सावरत असतानाच हा एक नवीन धक्का बसला आहे. मुंबई पोलिसांनी या टोळीतील चार जणांना अटक केली आहे.
अश्लील व्हिडीओ बनवून खंडणी वसूली -
झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, या टोळीतील काही सदस्य स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मद्वारे स्टार्सशी जवळीक वाढवायचे आणि त्यांचा विश्वास जिंकून नंतर व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून त्या स्टारचा अश्लील व्हिडीओ बनवायचे. हे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकू अशी भीती दाखवून त्यांना ब्लॅकमेल (Black Mail) करुन आणि मोठी खंडणी वसूल करायचे. या टोळीने 258 लोकांना सेक्स्टॉर्शनमध्ये अडकवलं असून, यात बॉलिवूड आणि टीव्हीवरील 100 स्टार्सचाही समावेश आहे.
या लोकांना ब्लॅकमेल करून या टोळीने लाखो रुपये जमा केले आहेत. तसंच हे व्हिडीओ ट्विटर, डार्क नेट आणि टेलिग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून इतरांना विकून त्यातूनही लाखो रुपये मिळवले आहेत. ज्या स्टारचा न्यूड व्हिडीओ (Nude Video) हवा आहे, तो उपलब्ध करून देण्याचा दावा या टोळीतील सदस्य करत असल्याचंही पोलिसांच्या चौकशीत समोर आलं आहे.
पोलीस यंत्रणेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी या टोळीने आर्थिक व्यवहारांसाठी नेपाळमधील (Nepal) बँक खात्याचा वापर केल्याचं सायबर सेलच्या (Cyber Cell) तपासात उघड झालं आहे. सायबर सेलने आता नेपाळ प्रशासनाला या प्रकरणाची माहिती दिली असून, बँक खात्याशी संबंधित तपशील मागितला आहे.
मुंबई पोलिसांनी नागपूर, ओडिशा, गुजरात, कोलकाता येथून 4 आरोपींना अटक केली असून, त्यापैकी 2 आरोपी व्यवसायाने इंजिनिअर्स (Engineers) आहेत, तर एक अल्पवयीन आहे. त्यांच्याकडून मोबाईल्स, 12 बनावट बँक खात्यांची कागदपत्रं, 6 बनावट ईमेल आयडी आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त करण्यात आली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Mumbai Poilce