मुंबई 17 सप्टेंबर: भारतरत्नं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक मुंबईतील दादर येथील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येत आहे. या जागेवर शुक्रवार (18 सप्टेंबर) दुपारी 3 वाजता बाबासाहेबांच्या पुतळ्याची पायाभरणी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा पायाभरणी सोहळा पार पडणार आहे. यावेळी अनेक मंत्रीही उपस्थित राहणार आहेत. मात्र या समारंभावरून अनेक मंत्री नाराज असल्याची माहिती पुढे आली आहे.
या कार्यक्रमाची निमंत्रणं अनेक मंत्र्यांना पोहोचलीच नाहीत. तर अनेकांना कार्यक्रमाची माहितीसुद्धा नाही. जे मंत्री उपस्थित असणार आहेत त्यांना ही अगदी कमी कालावधीत या कार्यक्रमाची मुख्यमंत्री कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित हा कार्यक्रम होणार असला तरी उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत किंवा नाही याबाबत मात्र अजुन चित्र स्पष्ट झालेलं नाही.
सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वात आधी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आणि शरद पवार यांनी या स्मारकाचा आढावा घेतला होता. अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या या स्मारकाच्या महत्वाच्या कार्यक्रमाची माहिती नसल्याने अनेक मंत्री नाराज आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
MMRDA बाबासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकाचा प्रकल्प पुर्ण करणार आहे.
भारतरत्नं डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाची अशी आहेत वैशिष्ट
स्मारकाची उंची 450 फूट.
पुतळ्याची उंची 350 फूट.
स्मारकाचा एकुण खर्च 1000 कोटी रुपये पर्यंत जाण्याची शक्यता.
हा खर्च MMRDA अंतर्गत करण्यात येणार आहे.
स्मारक प्रकल्प पुढील 3 वर्षात पुर्ण करणार.
स्मारकात बौद्ध वास्तूरचना शैलीतील घुमट.
संग्रहालय आणि प्रदर्शन भरवण्याची व्यवस्था.
स्मारकाच्या एकुण जागेपैकी 68 % जागा खुली हरीत जागा असेल.
स्मारक सर्वोत्कृष्ट करण्यासाठी आंतराराष्ट्रीय तज्ञांची मदत घेतली जातेय.