मुंबई ,12 फेब्रुवारी : नवविवाहित सुनेला घातक ड्रग देऊन, नंतर तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याचा आरोप असलेल्या सासऱ्यासह (Father in Law) 16 आरोपींपैकी तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने (Mumbai Highcourt) नुकताच फेटाळून लावला. इंडियन एक्स्प्रेसने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे. हे कुटुंब उत्तर प्रदेशातलं असून 16 जणांवर आरोप आहेत. त्यापैकी पीडित महिलेचे सासरे आणि त्यांचे दोन मुलगे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. या दोन मुलांमध्ये पीडितेच्या पतीचाही समावेश आहे. या कुटुंबाविरोधातील प्राथमिक माहिती अहवाल (FIR) रद्दबातल ठरवण्यास हायकोर्टाने आधीही नकार दिला होता. तसंच, त्यांच्याविरोधात लावण्यात आलेले आरोप गंभीर असल्याने त्यांची कोठडीत चौकशी होण्याची गरज आहे, असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आणि आठ फेब्रुवारी रोजी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. न्या. सारंग व्ही. कोतवाल यांच्या पीठाने हा निर्णय दिला. सहा जून 2020 रोजी पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला होता. हे ही वाचा- मित्रानं चोरलेला मोबाईल मिळवण्यासाठी ‘तो’ मुलगी बनला आणि… पीडित महिलेने दाखल केलेल्या FIRमध्ये असं लिहिलं होतं, की 2019मध्ये ती तिच्या माहेरी असताना तिच्या भावी सासू-सासऱ्यांकडून हुंड्यासाठी तिच्यावर दबाव आणण्यात आला. धमक्यांमुळे तिच्या वडिलांनी 6 जुलै 2019 रोजी जवळपास 20 लाख रुपये रोख स्वरूपात त्यांना दिले. त्यानंतर 8 जुलै 2019 रोजी तिचा विवाह झाला. विवाहानंतर पीडितेच्या पतीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. तसंच त्याच्यावर नपुंसकत्व दूर होण्यासाठीचे उपचार सुरू असल्याचंही तिला कळलं. विवाहानंतरही तिच्या सासरकडून हुंड्याची मागणी सुरूच राहिली. 22 जानेवारी 2020 रोजी तिचा पती, दीर आणि सासरे यांनी तिच्या खोलीत प्रवेश करून तिच्यावर जबरदस्ती केली. पीडितेचे सासरे वैद्यकीय व्यावसायिक आहेत. त्यांनी तिच्या इच्छेविरुद्ध तिला कोणतं तरी इंन्जेक्शन (Drug) दिलं. त्यानंतर त्यांच्या दोन मुलांनी तिला आडवं पाडलं आणि सासऱ्यांनी तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर काही दिवसांनी तिला माहेरी पाठवण्यात आलं आणि हुंड्याची मागणी पूर्ण झाल्याशिवाय तिला पुन्हा सासरी नेलं जाणार नाही, अशी धमकी तिच्या आई-वडिलांना देण्यात आली. नंतर पीडित महिला मार्च 2020मध्ये मुंबईत आली आणि तिने आपल्या बहिणीला या साऱ्या अन्यायाची माहिती दिली. त्यानंतर जून 2020मध्ये FIR दाखल करण्यात आला. न्या. कोतवाल आपलं निरीक्षण नोंदवताना म्हणाले, ‘केवळ FIR उशिरा दाखल केला असल्यामुळे पीडितेचे आरोप खोटे आहेत, असं मानणं शक्य नाही. अशा प्रकरणांमध्ये FIR दाखल करण्यास झालेल्या उशिराची कारणं पीडिता सांगू शकते. सुनावणीच्या वेळी ती गृहीत धरली पाहिजेत. गुन्ह्याची तीव्रता दुर्लक्षित करता येणार नाही.’ आरोपींचा अटकपूर्व जामीन (Anticipatory Bail) फेटाळताना कोर्टाने असं निरीक्षण नोंदवलं, की पीडितेला घातक इंजेक्शन देण्यात आलं, हुंड्याची मागणी करण्यात आली, हुंडा घेण्यात आला, तसंच पीडितेच्या पतीवर नेमके कोणते उपचार सुरू आहेत आणि या सगळ्या गोष्टी लपवण्याचा झालेला प्रयत्न या अनुषंगाने कोठडीत चौकशी होणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.