मुंबई, 08 जून : कोरोनाच्या पहिल्या लाटेला थोपवणाऱ्या मुंबईने कोरोनाच्या (Coronavirus in mumbai) दुसऱ्या लाटेवरही बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलेलं आहे. हेच मुंबईतील कोरोनाची आजची आकडेवारी सांगते आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसलेल्या मुंबईत या लाटेदरम्यान पहिल्यांदाच दिलासादायक अशी आकडेवारी पाहायला मिळाली आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून आज पहिल्यांदाच एक आकडी मृत्यूची नोंद (Corona death in mumbai) आणि सर्वाधिक कमी नवे रुग्ण नोंदवले (Corona new cases in mumbai) गेले आहेत. नव्या रुग्णांपेक्षा बऱ्या झालेल्या रुग्णांचं प्रमाण अधिक आहे. मुंबई महापालिकेच्या 8 जूनच्या आकडेवारीनुसार 24 तासांत 673 रुग्ण सापडले आहेत, तर 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आज एक आकडी मृत्यूची नोंद झाली आहे. 28 मार्चनंतर या वर्षात पहिल्यांदाच एक आकडी मृत्यू नोंदवला गेला आहे. तर 23 फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच सर्वाधिक कमी म्हणजे 673 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
One-day #COVID19 fatality count in #Mumbai falls to single digit at seven, first time after March 28 this year; 673 new cases, lowest after February 23, raise tally to 7,13,002: Brihanmumbai Municipal Corporation
— Press Trust of India (@PTI_News) June 8, 2021
मुंबईत आज दिवसभरात 751 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 680009 रुग्ण बरे झाले असून रिकव्हरी रेट 95% आहे. हे वाचा - Corona : कोल्हापूर-रत्नागिरी वगळता बहुतांश ठिकाणी दिलासाच, रिकव्हरी रेट 95% महाराष्ट्रात पुणे, मुंबई या शहरांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोरदार तडाखा बसला. त्यामुळं इथं अत्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. ते आता हटवण्यात येत असून, मुंबई तिसऱ्या स्तरावर असल्यानं तिथं सर्व निर्बंध हटवण्यात आलेले नाहीत. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन आधीच नियोजन करण्यात येत असून, नवीन नियम लागू करण्याबाबत शासन बृहन्मुंबई महापालिकेशी चर्चा करून निर्णय घेणार आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महापालिका कोणतीही परिस्थिती हाताळण्यास सज्ज असल्याची ग्वाही महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. मात्र नागरिकांनी सुरक्षा नियमांचे पालन करणं अत्यावश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं. हे वाचा - डेल्टानंतर भारतात आणखी एक भयंकर कोरोना; पुण्यात सापडला सर्वात घातक स्ट्रेन दुसऱ्या लाटेचा कहर आपण अनुभवलाच. आता तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांनी वर्तवला असून त्यात सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन आधीच सज्ज झालं असून त्यादृष्टीनं नियोजन करत आहे. दुसरी लाट ओसरली असली तरी धोका अजून टळलेला नाही हे लक्षात घेऊन लोकांनी सुरक्षा नियमांचे पालन करणं आवश्यक आहे, अशी सूचना काकाणी यांनी केली.

)







