मुंबई, 13 जून: सोशल मीडियात एक व्हिडीओ जोरदार व्हायरल (Video Viral) झाला आहे. या व्हिडीओत दिसत आहे की पार्क करण्यात आलेली एक कार पाण्यात बुडत (Car sinks) आहे. हा व्हिडीओ मुंबईतील घाटकोपर (Ghatkopar, Mumbai) परिसरातला असल्याचं समोर आलं आहे. कार पाण्यात बुडत असल्याचं वृत्त आणि त्याचा व्हिडीओ सर्वत्र जोरदार व्हायरल झाला. या घटनेनंतर सोशल मीडियात अनेक कमेंट्स, मीम्स व्हायरल होत आहेत त्यातच आता इंधन दरवाढीमुळे कारने आत्महत्या केल्याचं ट्विट समोर आलं आहे. खरं तर विहिरीवर बांधण्यात आलेलं आरसीसी खचल्यामुळे ही कार विहिरीत कोसळली. तब्बल 12 तासांनंतर ही कार बाहेर काढण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी वाढत्या इंधन दरवाढीचा संदर्भ देत टिप्पण्णी केली आहे. आपल्या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं, #पेट्रोल #डिझेल दरवाढीमुळे कारने आत्महत्या केली.
Because of price rise car commits suicide#petrol#diesel pic.twitter.com/B9mSswnagv
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 13, 2021
सोसायटीत अचानक खड्डा पडला आणि कार बुडाली, BMC ने सांगितले खरे कारण… VIDEO कार पाण्यात बुडत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर मुंबई महानगरपालिकेकडूनही यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. मुंबई मनपाने म्हटलं, घाटकोपर पश्चिम परिसरातील एका खासगी सोसायटीच्या परिसरात उभी असलेली एक कार पाण्यात बुडत असल्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे. या अनुषंगाने महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे कळविण्यात आले आहे की, सदर व्हिडीओतील घटना आज दिनांक 13 जून 2021 रोजी सकाळी घाटकोपर पश्चिम परिसरात घडलेली आहे. सदर सोसायटीच्या आवारात एक विहिर आहे. या विहिरीच्या अर्ध्या भागावर ‘आरसीसी’ करून ती विहीर झाकण्यात आली होती. त्या ‘आरसीसी’ केलेल्या भागावर सोसायटीतील रहिवाशी ‘कार पार्क’ करीत असत. हाच ‘आरसीसी’ चा भाग खचून त्यावर ‘पार्क’ केलेली एक कार पाण्यात बुडाली, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. सदर कारमध्ये कोणीही नसल्याने घटनेत कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही, तसेच कोणीही जखमी झालेले नाही.