आता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट!

आता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट!

मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांसाठीची एक आनंदाची बातमी आहे. ज्येष्ठ नागरिकांना आता निम्म्या तिकिटामध्ये बेस्टमधून प्रवास करता येणार आहे.

  • Share this:

मुंबई, 19 सप्टेंबर : मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांसाठीची एक आनंदाची बातमी आहे. ज्येष्ठ नागरिकांना आता निम्म्या तिकिटामध्ये बेस्टमधून प्रवास करता येणार आहे. या योजनेसाठी पालिकेकडून बेस्ट ला 2018-19 या वर्षांसाठी तीन कोटी रुपये देण्यात येणार आहे. मात्र, केवळ मुंबईत राहत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना बेस्टकडून स्मार्ट कार्ड देण्यात येणार असून, त्यासाठी त्यांना रहिवाशी पुरावा आणि वयाचा दाखला बेस्टकडे सादर करावा लागणार आहे.

वाढत्या तोट्यामुळे विस्कटलेली घडी सावरण्यासाठी बेस्ट उपक्रमाला विविध सवलतींच्या योजना कुलूपबंद कराव्या लागल्या. मात्र, ज्येष्ठ नागरिकांना निम्म्या तिकिटामध्ये बेस्टच्या बसमधून प्रवास करता यावा यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. या योजनेसाठी पालिकेकडून बेस्ट उपक्रमाला 2018-19 या वर्षांसाठी तीन कोटी रुपये देण्यात येणार आहे. मात्र, या योजनेचा लाभ फक्त मुंबईत वास्तव्यास असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाच घेता येणार आहे.

वयाची ६० वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना बेस्ट बसमधून प्रवास करण्यासाठी सवलत मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाकडून सातत्याने पालिकेकडे करण्यात येत होती. या मागणीची दखल घेऊन पालिकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी बेस्टच्या विनावातानुकूलित बसमधून ५० टक्के सवलतीच्या दराने प्रवास करण्याची योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

या योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना बेस्टकडून स्मार्ट कार्ड देण्यात येणार असून त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना रहिवाशी पुरावा आणि वयाचा पुरावा बेस्टला सादर करावा लागणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना या स्मार्ट कार्डसाठी शुल्क आकारण्यात येणार असून, प्रवासादरम्यान स्मार्ट कार्ड सोबत ठेवणे बंधनकारक राहणार आहे.

असे आहेत नियम

- या योजनेचा लाभ केवळ मुंबईत वास्तव्यास असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाच घेता येणार आहे.

- यासाठी आधार कार्ड, शिधावाटप पत्रिका, मतदार ओळखपत्र, शासनाच्या सक्षम अधिकाऱ्याने दिलेला रहिवाशी दाखला, पासपोर्ट आदींपैकी एक सादर करणे आवश्यक आहे.

- वयाची ६० वर्षे पूर्ण केल्याचा पुरावा ही सादर करावा लागणार आहे.

- बेस्टच्या अन्य कोणत्याही सवलतीचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही.

- पालिकेकडून अंध व अपंग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या प्रवास सवलतीच्या धर्तीवरच बेस्टच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे.

 सलमाननं जागवली स्पेशल मुलांमध्ये 'उमंग'

First published: September 19, 2018, 4:49 PM IST

ताज्या बातम्या