Home /News /mumbai /

'पक्षशिस्तीचे पालन करा, अन्यथा...', मनसेच्या ज्येष्ठ नेत्याची कार्यकर्त्यांना तंबी

'पक्षशिस्तीचे पालन करा, अन्यथा...', मनसेच्या ज्येष्ठ नेत्याची कार्यकर्त्यांना तंबी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते नितीन सरदेसाई यांनी कार्यकर्त्यांसाठी सोशल मीडियाद्वारे एक विशेष संदेश जारी केला आहे.

    मुंबई, 7 मार्च : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) ज्येष्ठ नेते नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) यांनी कार्यकर्त्यांसाठी सोशल मीडियाद्वारे (Social Media) एक विशेष संदेश जारी केला आहे. या संदेशातून त्यांनी कार्यकर्त्यांना पक्षशिस्तीचे पालन करण्याचे आवाहन केलं आहे. तसेच त्याचे पालन न केल्यास गंभीर दखल घेतली जाईल, अशी तंबी मनसैकांना दिली आहे. त्यामुळे आता मनसैनिक आपल्या पक्षश्रेष्ठींचं कितपत ऐकतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. नितीन सरदेसाई नेमकं काय म्हणाले? "महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची अधिकृत भूमिका प्रसारमाध्यमांमध्ये मांडण्याचे काम पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व प्रवक्ते करीत असतात. पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि प्रवक्त्यांव्यतिरिक्त इतर कोणीही प्रसारमाध्यमांसमोर राजकीय भूमिकांबाबत भाष्य करु नये", असं आवाहन नितीन सरदेसाई यांनी केलं आहे. "पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी समाजमाध्यमांवर वा अन्यत्र कुठेही राजकीय टीका-टिप्पणी करताना भाषेचे भान बाळगावे. पक्षशिस्तीचे पालन प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला करावेच लागेल, अन्यथा गंभीर दखल घेतली जाईल", अशी तंबी मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे. (14 तारखेला अनेकांचे मास्क काढणार, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना थेट इशारा) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला अल्टिमेटम दिला होता. त्यांच्या अल्टिमेटम नंतर राज्य सरकारने मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली होती. तरीही मनसेची ती भूमिका कायम राहिली. त्यामुळे काही मनसे पदाधिकाऱ्यांची पोलिसांनी धरपकड सुरु केली. या दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे यांना ताब्यात घेत असताना पोलिसांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला. तसेच संदीप देशपांडे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाही. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे. या सगळ्या घडामोडींमुळे मनसैनिकांमध्ये राज्य सरकारच्या विरोधात नाराजी आहे. त्यामुळे मनसैनिकांनी रागात काही नकारात्मक वक्तव्य बोलून आणखी अडचणी वाढवू नये, या उद्देशाने नितीन सरदेसाई यांनी बोलताना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: MNS

    पुढील बातम्या