मुंबई, 20 जून : राज्यसभा निवडणुकीच्या सत्तासंघर्षानंतर विधान परिषदेची(MLC Election result) निवडणूक पार पडली आहे. मतदान प्रक्रिया पार पडली आहे. पण काँग्रेसने (congress) भाजपच्या दोन आमदारांवर (bjp mla) आक्षेप घेतला आहे. काँग्रेसने याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेची मतमोजणीही लांबणीवर पडण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. विधान परिषदेसाठी दुपारी ४ वाजेपर्यंत २८५ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतपेट्या बंद करण्याआधी काँग्रेसने भाजपचे आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्यावर आक्षेप घेतला आहे. गुप्त पद्धतीने मतदान असताना मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांचे मत हे दुसऱ्या व्यक्तीने मतपेटीमध्ये टाकले आहे. त्यानंतर मुक्ता टिळक आणि लक्ष्ण जगताप यांनी सही सुद्धा केली. जर दोन्ही आमदारांनी सही केली असेल तर मतपत्रिका ही दुसऱ्या व्यक्तीने का टाकली, असा आक्षेप काँग्रेसने घेतला आहे. त्यामुळे 5 वाजता मतमोजणी सुरू होईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे. मतपत्रिकेवर प्राधान्य क्रम लिहिणे आणि मतपत्रिका मतपेटीत टाकणे या दोन्ही बाबी दोन्ही मतदात्यांच्या प्रतिनिधी यांनी केल्याने मतदान हे अवैध ठरते, असा आक्षेप काँग्रेसने घेतला आहे. निवडणुकीच्या आचार संहिता 1961 चं हे उल्लंघन असल्याचं या आक्षेपात नोंदवलं आहे. त्यामुळे राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेची निवडणूकही लांबणीवर पडण्याची चिन्ह आहे. दरम्यान, भाजपने मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून परवानगी घेतली होती असा दावा केला आहे. काँग्रेसने घेतलेला आक्षेप हा अत्यंत असंवेदनशील आहे, अशी टीका भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर, १० जागांसाठी शांततेत मतदान झाले. आता काही मिनिटांपूर्वी कळले की काँग्रेसने आक्षेप घेतलाय. देवेंद्र फडणवीस म्हणातात की, हे असंवेदनशील आहे. पण मला सांगावे की आमदारांना बरे नसताना मतदानासाठी का बोलावले. त्यावरून तुमची संवेदनशिलता दिसते. आक्षेप घेतलाय त्यावर निवडणूक आयोग निर्णय घेईल. त्यावर इतका आकांडतांडव का करता. भाजप हे पार्श्वभुमी तयार करत आहे कारण ते हरणार आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.