Home /News /mumbai /

मी आणि आई : शेवटी मी आईचा Co-Cooking Partner झालो!

मी आणि आई : शेवटी मी आईचा Co-Cooking Partner झालो!

आपण जेवतो ना, मग स्वयंपाक करता यायला हवा, इतकं साध लॉजिक आहे.

    मुंबई, 17 मे : नमस्कार, माझं नाव अभिषेक दीक्षित (नाव बदललं आहे). घरात मी, आई आणि छोटा भाऊ असे तिघेजण राहत होतो. (Mothers Day 2022) सर्वसाधारणपणे असा  विचार केला जातो की, मुलाची बायको आली की, आईवरील ताण कमी होईल. (Me and Mother) बायकोमुळे आईला स्वयंपाक आणि इतर गोष्टींमध्ये मदत होईल. इतकच काय तर बायको आल्यावर तिच आईला सांभाळेल. या गोष्टी मला न पटणाऱ्या आहेत. मूळात आपण आपल्या आईची काळजी घेऊ शकत नाही का? म्हणजे येणाऱ्या बायकोने आईची जबाबदारी घ्यावी, अशी अपेक्षा करणं माझ्यालेखी अतिरेकीपणा आहे. साधारण कॉलेजमध्ये असेपर्यंत घरातील सर्व जबाबदारी आणि अर्थात माझीही आईवर होती. म्हणजे स्वयंपाकापासून ते मला सॉक्स शोधून देण्यापर्यंत तिच सर्व काम करीत होती. पण कळता झाल्यानंतर आईची धावपळ पाहवत नव्हती. त्यामुळे मी आईला तिच्या कामात हातभार लावायचा ठरवलं. तशी मला खाण्याची आवड आहे, त्यामुळे काही कारणं सांगून आईकडून अनेक पदार्थ शिकून घेतले. इतर 'आयां'सारखं तिनेही मला काम करण्यापासून रोखलं नाही. हळू हळू मी नियमित स्वयंपाक करू लागलो आणि मी आईचा को कुकिंग पार्टनर झालो. अगदी रात्री ऑफिसरमधून आलो की, स्वयंपाक घराच्या दिशेने धाव घेतो. आज काय स्वयंपाक करायचा याची चर्चा होते, मग कॉफी झाली की, मी आणि आई कामाला लागतो. हीच परिस्थितीत सकाळचीही असते. सकाळी लवकर उठून भाजी, पोळ्या सर्व काही मी करतो. अनेकदा आईच मला मदत करते, असं म्हणायला हरकत नाही. त्यानिमित्ताने का होईना, आईला माझा आधार वाटतो. माझ्या आईने कायम स्वयंपाक घरात राहून कष्ट केलेलं मला कधीच आवडलं नाही. तिचा जन्म केवळ आम्हाला खाऊ घालण्यासाठी झालेला नाही. हे मुलांनी वेळीच ओळखायला हवं. माझ्या मित्रांना माझं कौतुक वाटतं. पण मला यात काही वेगळं असं वाटत नाही. आपण जेवतो ना, मग स्वयंपाक करता यायला हवा, इतकं साध लॉजिक आहे. तर अनेक मित्र मलाही स्वयंपाक करता येतो असं सांगतात. मात्र कधीतरी करणं ही वेगळी बाब आहे. स्वयंपाक अंगवळणी पडली तर खरी किमया. पुरुषांनीही ही बाब समजून घ्यायला हवी. आई काही स्वयंपाक करण्याचं यंत्र नाही. तुम्ही तिला कधी तरी नाही तर नेहमीच मदत करायला हवी. अगदी पुरुष असला तरी नियमित. तरच आईला खरा आणि शाश्वत आधार मिळू शकेल असं मला वाटतं. (यंदाच्या मदर्स डे निमित्ताने News 18 लोकमतने एक वेगळाच प्रयत्न केला आहे. आतापर्यंत आपण मदर्स डेच्या दिवशी आईमुळे आपल्या आयुष्यात काय काय बदल झाले. तिने कष्ट केलं, ती आमच्यासाठी झिजली, तिने फक्त मुलांचा आणि घराचा विचार केला म्हणून आम्ही उभे राहिलो वगैर वगैर मनोगतं सोशल मीडियावर पाहायला मिळतात. मात्र यंदा मदर्स डेच्या निमित्ताने आईसाठी आपण काय करायला हवं, तिचं आयुष्य सुखकर होण्यासाठी स्वत:मध्ये काय बदल करण्याची गरज आहे हे काही जणांच्या अनुभवातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत.)
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Mother

    पुढील बातम्या