Home /News /mumbai /

'मी आणि आई!': माहेरी आल्यावर खाटेवर बसून ऑर्डर सोडणाऱ्यांचा संताप येतो, म्हणूनच तर...

'मी आणि आई!': माहेरी आल्यावर खाटेवर बसून ऑर्डर सोडणाऱ्यांचा संताप येतो, म्हणूनच तर...

गेली 40 वर्षे आई घर सांभाळतेय. तिचे रखरखीत हात, चेहऱ्यावर आलेले सुरकुत्या पाहिल्या की, डोळे भरून येतात. आईने कधी आराम करायचा, तिने कधी आपल्या मनासारखं वागायचं?

    मुंबई, 10 मे : नमस्कार, माझं नाव अलका गवळी (नाव बदललेलं आहे). यंदा मदर्स डे निमित्ताने मलाही काहीतरी लिहावं असं वाटत होतं. पण ते नेहमीसारखं नाही. काहीतरी वेगळं. जी गोष्ट मला नेहमी टोचलं, असंही काहीतरी. अनेकांना कदाचित माझं मत पटत नसेल. पण मला ते जास्त महत्त्वाचं वाटतं. कारण ते माझ्या आईच्या सुखाबाबत आहे. 8 वर्षांपूर्वी माझं लग्न झालं. सुदैवाने लग्नानंतरही मी मुंबईतच राहत होते. माझं बालपण मुंबई उपनगरात गेलं. आणि लग्नानंतर थेट मुंबईतील दादरसारख्या भागात राहू लागले. माझी जगणघडणीत आईचा खूप मोठा वाटा आहे. आयुष्यभर माझ्यासाठी झटल्यानंतर मी तिच्यासाठी काहीतरी करावं असं मला नेहमी वाटायचं. तिला भेटवस्तू देणं, साडी, दागिने हे सर्व आलचं. पण याहून अधिक काहीतरी. सर्वसाधारणपणे माहेरवाशीणी लग्न झाल्यानंतर जेव्हा परत कधी माहेरी येतात तर त्याचं खूप लाड केलं जातं. आई तर अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे तिला सांभाळते. मुलीही माहेरी आल्यावर एकाही कामाला हात लावत नाही. मी आराम करायला आल्याचं सांगून सर्व काम आईकडून आणि असेल तर नणंद इतरांना करायला सांगतात. आईदेखील मुलगी काही दिवसांसाठी आलीये असं मानून कुठल्याही दुखणीची आठवण न आणता करत राहते. माझ्या ओळखीच्या तर अशाही काही मुली आहेत, त्यांची आई त्यांच्या जरी घरी गेली तर तेथेही आईच रांधत असते. अगदी मुलीपासून जावई, नातवंडांचं सर्व काही करीत राहते. मला अनेकदा ही बाब खटकते. तुम्हाला आराम करायला माहेर असतं, पण आईचं काय? माझ्या आईचे आई-वडील माझ्या जन्माआधीच गेले होते. त्यामुळे आईला असं माहेर कधी नव्हतं. एक भाऊ आहे पण तोही परदेशात असल्यानं आई आराम अशी कुठे करणार... त्यामुळे मी कळती झाल्यापासून आई माझ्यासमोर काम करते, आणि मी बसून आहे असं कधीच झालं नाही. लग्नानंतर तर मी हे अधिक पाळलं. मी माहेरी आल्यावर आईला आराम. तिला अगदी तिच माहेरच घरी आल्यासारखं वाटतं. मी जितक्या दिवस तिथं असते, त्या वेळात आईला स्वयंपाक घरातून सुट्टी..अगदी इतक कामंही तिने केलेली मला आवडत नाही. हे फक्त मी माहेरी गेल्यावरच नाही तर कधी आईही माझ्या सासरी आली तरी हाच नियम..तिने कोणत्याही कामाला हात लावलेलं मला आवडत नाही. मग तो वेळ हा तिचा असतो. त्यात ती गाणं म्हणते, काही तरी वाचते की स्वयंपाक घरात खुर्चीवर बसून माझ्याशी गप्पा मारते. तिला आराम कराताना पाहिलं की मला बरं वाटतं. मुलगीच आईला समजून घेतात असं खूप जणं म्हणतात. मात्र ते केवळ म्हणण्यापूरतं असू नये. तर प्रत्यक्षातही मुलींनी हा विचार करायला हवा. गेली 40 वर्षे आई घर सांभाळतेय. तिचे रखरखीत हात, चेहऱ्यावर आलेले सुरकुत्या पाहिल्या की, डोळे भरून येतात. आईने कधी आराम करायचा, तिने कधी आपल्या मनासारखं वागायचं, असे अनेक प्रश्न समोर उभे असतात. मी आईला स्वयंपाकासाठी एखादी बाई लाव म्हणून वारंवार सांगते. पण आईच ती...ऐकणार थोडीये. आईच्या सुखासाठी मी उचललेलं हे छोटसं पाऊल. (यंदाच्या मदर्स डे निमित्ताने News 18 लोकमतने एक वेगळाच प्रयत्न केला आहे. आतापर्यंत आपण मदर्स डेच्या दिवशी आईमुळे आपल्या आयुष्यात काय काय बदल झाले. तिने कष्ट केलं, ती आमच्यासाठी झिजली, तिने फक्त मुलांचा आणि घराचा विचार केला म्हणून आम्ही उभे राहिलो वगैर वगैर मनोगतं सोशल मीडियावर पाहायला मिळतात. मात्र यंदा मदर्स डेच्या निमित्ताने आईसाठी आपण काय करायला हवं, तिचं आयुष्य सुखकर होण्यासाठी स्वत:मध्ये काय बदल करण्याची गरज आहे हे काही जणांच्या अनुभवातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत.)
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Mother

    पुढील बातम्या