मुंबई, 03 जुलै: मुंबईतील भांडुप (Bhandup) याठिकाणी एका विवाहित महिलेनं इमारतीच्या 18 व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या (Married woman commits suicide) केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेची वेळी नवरा आणि दोन मुली घरातच होत्या. त्यांना काही काही कळायच्या आत विवाहितेनं इमारतीवरून उडी घेतली आहे. या दुर्दैवी घटनेत विवाहितेचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून या घटनेचा तपास सुरू केला आहे. संबंधित आत्महत्या केलेल्या 38 वर्षीय विवाहित महिलेचं नाव रुपाली नांदविलकर असून त्या आपल्या पती आणि दोन मुलींसह भांडुप येथील मायक्रो सृष्टी नावाच्या इमारतीत वास्तव्याला होत्या. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास मायक्रो सृष्टी इमारतीच्या 18 व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. मृत रुपाली मागील पाच वर्षांपासून मानसिक आजारानं त्रस्त होत्या. यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला. हेही वाचा- Mumbai: इंटरनेटवरून विधवा अन् घटस्फोटीत महिलांना हेरायचा; मग अशी करायचा फसवणूक मृत रुपाली या गृहिणी होत्या तर रुपाली यांचे पती अंधेरी येथील एका खाजगी कंपनीत नोकरीला होते. रुपाली नांदविलकर आत्महत्या करत असताना घरात पती आणि दोन मुलीही होत्या. त्यामुळे या आत्महत्येमागं आणखी काही कारणं दडली आहेत का? याचा तपासही पोलिसांकडून केला जात आहे. तूर्तास पोलिसांनी या घटनेची नोंद अपघाती मृत्यू अशी केली, असून तपासाला सुरुवात केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.