मुंबई, 13 जानेवारी : महाराष्ट्रातील दुकानांच्या पाट्या या आता मराठीतच (Marathi boards on shops) असणार आहेत. त्या संदर्भातील निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी (12 जानेवारी 2022) घेण्यात आला. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनयमन) अधिनियम, 2017 यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणेच छोट्या दुकानावरील पाट्याही आता मराठीत कराव्या लागतील. त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी ट्विट करत हे श्रेय केवळ महाराष्ट्र सैनिकांचं असल्याचं म्हटलं आहे. काय म्हटलं आहे राज ठाकरेंनी? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, ह्या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात ह्यासाठी खरंतर आंदोलन करावं लागूच नये. परंतु 2008, 2009 साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या. इतरांनी श्रेय लाटण्याचा आचरटपणा करु नये काल महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने दुकानांवरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय घेतला. तेव्हा त्याचं श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे. त्या सर्वांना मन:पूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करु नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच असंही राज ठाकरेंनी आपल्या पत्रकात म्हटलं आहे. आणि महाराष्ट्र सरकारचंही अभिनंदन. सरकारला आता मी इतकंच सांगेन की आता कच खाऊ नका, ह्याची अंमबलबजावणी नीट करा.
#राजभाषा_मराठी #महाराष्ट्र_धर्म pic.twitter.com/MQhQ4DGcvk
— Raj Thackeray (@RajThackeray) January 13, 2022
महाराष्ट्रातील प्रत्येक दुकानाची पाटी मराठीतच असावी, सरकारचा निर्णय दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम 2017 हा अधिनियम लागू होत असल्याने दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याचे आढळून आले. अशा प्रकारच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या व त्यावर उपाययोजना करण्याची मागणीही होत होती. बुधवारी (12 जानेवारी 2022) मंत्रिमंडळाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनयमन) अधिनियम, 2017 यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणेच छोट्या दुकानावरील पाट्याही आता मराठीत कराव्या लागतील. बहुसंख्य दुकाने व व्यापारी पेढ्यांमध्ये दहापेक्षा कमी कामगार असतात, हे लक्षात घेता यापुढे रस्त्यालगतच्या सर्वच दुकांनावरील पाट्या मराठीत लागलेल्या दिसतील. मराठीत-देवनागरी लिपितील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशीही दुरुस्ती मंजूर करण्यात आली. राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी यासाठी मंत्रालयात संबंधीतांची बैठक घेतली व कायदा सुधारण्याचा निर्णय घेतला.

)







