मुंबई, 22 डिसेंबर : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session) मुंबईत आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात राज्य सरकारला (State Government) कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांकडून खास रणनीती ठरवण्यात आली आहे. त्याच दरम्यान ठाकरे सरकारनेही (Thackeray Government) विरोधकांच्या रणनितीला शह देण्यासाठी खास योजना आखली आहे. आज सकाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) विधिमंडळातील सर्व सदस्यांची एक बैठक घेण्यात आली. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांनी विधान भवनात महाविकास आघाडी सरकारचे मंत्री महोदय आणि विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत सभागृहाच्या कामकाजाबद्दल चर्चा व मार्गदर्शन केले. विरोधकांच्या प्रश्नांना सामोरं जाताना कोणत्या मुद्द्यावर नेमकी महाविकास आघाडीची भूमिका काय असेल हे यावेळी सर्व आमदारांना सूचित करण्यात आलं. बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. या घटनेवरुन महाविकास आघाडी सरकार भाजपला सवाल उपस्थित करु शकते. अधिवेशनात या घटनेवरुन कर्नाटक सरकारच्या निषेधाचा ठराव मांडला जाऊ शकतो. एकूणच विरोधक आक्रमक होणार हे माहीत असंल्याने महाविकास आघाडी मात्र याला सामोरं जाताना एकजूट दिसली पाहिजे याची काळजी घेत आहे. आता विरोधक सत्ताधारी महाविकास आघाडीला विविध प्रश्नांवर धारेवर धरतायत की की सत्ताधारी वरचढ ठरतायत हे बघावं लागेल. आघाडी सरकार आणि भाजप आमनेसामने अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी सकाळीच विरोधी पक्ष भाजपने सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला घेरण्यासाठी सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेरही आक्रमकपणे निदर्शने करण्याची रणनिती आखली आहे. तसंच एसटी कर्मचाऱ्यांचा चिघळलेला संप आणि ओबीसी आरक्षणाच्या मूद्यांवर भाजप महाविकास आघाडीच्या नेत्यांवर प्रश्नांचा भडीमार करणार यात वादच नाही. तर दुसरीकडे सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महिला सुरक्षेसंदर्भात संवेदनशिल असलेले ‘शक्ती’ विधेयक विधिमंडळाच्या पटलावर आणणार आहे. या विधेयकावरूनही महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आमने सामने येणार आहेत. याच बरोबर प्रलंबित 5 विधेयकं आणि प्रस्तावित 21 विधेयकं ही विधिमंडळाच्या पटलावर येणार आहेत. या पाच दिवसांच्या अधिवेशनात किती विधेयकं मंजूर होतात यावर महाविकास आघाडी सरकारचं यश अवलंबून आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.