मुंबई, 28 डिसेंबर : महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच आता राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वत: ट्विट करुन या संदर्भात माहिती दिली आहे. (Maharashtra School Education Minister Varsha Gaikwad tests positive for covid19)
I learned today that I tested positive for COVID-19 after first feeling symptoms yesterday evening. My symptoms are relatively mild. I'm fine and have isolated myself. Request those who met me the past few days to take precautions.
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 28, 2021
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या दररोज सहभागी होत आहेत. आता वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्या अनेक मंत्री, आमदारांच्या संपर्कात आल्या होत्या त्यामुळे चिंता वाढली आहे.
अधिवेशनातील तब्बल 32 जणांना कोरोना
महाराष्ट्रात कोरोना आणि ओमायक्रोनबाधितांचा आकडा वाढत असताना दोन दिवसांपूर्वी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली. भाजप आमदार समीर मेघे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. मेघे यांनी फेसबुकवर याबाबतची माहिती दिली होती. विशेष म्हणजे समीर मेघे राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी झाले होते. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. मेघे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून शनिवारी (25 डिसेंबर) 1500 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यापैकी तब्बल 32 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये कोणत्याही लोकप्रतिनिधीचा समावेश नाही, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
राज्यात ओमायक्रॉनचा उद्रेक
राज्यात दिवसेंदिवस ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. सोमवारी (27 डिसेंबर) सुद्धा राज्यात 26 ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक 11 रुग्ण आढळले आहे. तर नांदेडमध्ये सुद्धा 2 रुग्ण आढळले आहे. राज्यात आता ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 167 वर पोहोचली आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने कोरोना परिस्थितीबद्दल माहिती दिली आहे. राज्यात 26 नवीन ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळले आहे. मुंबईमध्ये 11, रायगड 5 ठाणे 4 आणि नांदेडमध्ये 2 रुग्ण आढळले आहे. तर नागपूर, पालघर, भिवंडी आणि पुणे ग्रामीणमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.
राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद ही मुंबईमध्ये झाली आहे. मुंबईत आतापर्यंत 84 रुग्ण आढळले आहे. त्यापाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये 19 आणि पुणे ग्रामीणमध्ये 17 रुग्ण आढळले आहे. आज नवीन आढळलेल्या रुग्णांमध्ये 18 वर्षांखालील 4 जणांचा समावेश आहे. तर 26 पैकी 19 जणांचे पूर्ण लसीकरण झालेले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus