मुंबई, 10 मे : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात राज्यात 37,323 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या काही दिवसांच्या तुलनेत हा आकडा दिलासादायक आहे. दुसरीकडे आज राज्यातून 61,607 रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर आजपर्यंत एकूण 44,69,425 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 86.97 % एवढे झाले आहे.
आज राज्यात 37,326 नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले असून राज्यात आज 549 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.49% एवढा आहे. मुंबईत आज 1794 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून 74 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज रोजी एकूण 5,90,818 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. रविवारी 9 मे रोजी राज्यात एकूण 48 हजार 401 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर त्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांचा आकडा हा 60 हजार 226 एवढा आहे. राज्यात आजपर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 44 लाख 7 हजार 818 एवढी आहे.
हे ही वाचा-राज्यात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता; लवकरच कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार
दुसरीकडे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असून त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. या आजाराच्या जाणीवजागृतीसाठी मोहिम हाती घेण्यात येणार असून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात येतील,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. या आजावरील औषध महागडे असून त्यामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी असलेल्या 1000 रुग्णालयांमध्ये या आजाराच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील, असेही टोपे यांनी सांगितले. म्युकरमायकोसीस आजारावरील इंजेक्शन देखील चढ्या दराने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी असून त्याची किंमत निश्चित करून त्यावर नियंत्रण आणले जाईल, असेही टोपे यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona patient, Corona spread, Maharashtra