Coronavirus: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणांना दिले महत्वाचे निर्देश

Coronavirus: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणांना दिले महत्वाचे निर्देश

Maharashtra Health Minister Rajesh Tope यांनी राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता एक बैठक घेत आरोग्य यंत्रणांना महत्वाचे निर्देश दिले आहेत.

  • Share this:

मुंबई, 15 एप्रिल: महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य संस्थांमधील बेड्सची संख्या वाढवा. त्यासोबतच ऑक्सिजन (Oxygen), रेमडेसिवीर इंजेक्शनचे (Remdesivir Injection) व्यवस्थापन आणि वातावरणातून ऑक्सिजन निर्मितीची यंत्रणा उभारण्यावर भर द्या. तसेच खासगी रुग्णालयातील कोविड सेंटर्सना हे बंधनकारक करा. पॉझिटिव्ह रुग्णांना गृह अलगीकरणात ठेवण्या ऐवजी संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यावर भर द्यावा. जिल्ह्यांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढवा असे निर्देश आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी राज्यातील जिल्हा आरोग्य यंत्रणेला दिले.

आरोग्य संस्थांमधील कमतरता दूर करा

महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आरोग्य संस्थांमधील कमतरता दूर करा. ऑक्सिजनचे व्यवस्थापन करताना त्याचा अपव्यय आणि अतिरिक्त वापर होणार नाही याकडे लक्ष द्या. वातावरणातील ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणाऱ्या तंत्रज्ञानाचा सध्या वापर होत असून प्रत्येक जिल्ह्यात असे यंत्र बसवण्यासाठी प्रयत्न करावेत. ज्या खासगी रुग्णालयांमध्ये कोविड सेंटर्स सुरू आहेत त्यांना ही प्रणाली बसवणे बंधनकारक करण्यात यावे जेणेकरून ऑक्सिजन पुरवठ्याबाबत रुग्णालय सक्षम होतील असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्याची गरज

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्याची गरज असून ज्या जिल्ह्यांचे प्रमाण कमी आहे त्यांनी ते वाढवावे त्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मदतीने अन्य विभागातील मनुष्यबळ उलब्ध करुन घ्यावे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या निकटसहवासितांचा शोध घेणे अत्यंत आवश्यक असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

वाचा : कोरोना संकटात Remdesivir चा काळाबाजार करणाऱ्यांना बेड्या, पुणे पोलिसांची कारवाई

मृत्यू दर वाढण्याचे कारण शोधा

काही जिल्ह्यांचा मृत्यू दर वाढतोय त्याचे कारण शोधा. रुग्ण उपचारासाठी उशीरा दाखल होत असून त्यांनी वेळेवर दाखल व्हावं यासाठी जनजागृती करण्यात यावी जेणेकरून लक्षणं दिसताच रुग्ण वेळेवर रुग्णालयात येतील. त्यासाठी ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांच्या क्षेत्रातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची बैठक घ्यावी आणि लक्षणे असलेल्या रुग्णांची तातडीने चाचणी करताच अनावश्यक उपचार न करण्याबाबत सूचना द्याव्यात असंही आरोग्यमंत्री म्हणाले.

RTPCR रिपोर्ट 24 तासांत मिळायला हवा

Antigen चाचण्यांचे प्रमाण कमी करुन आरटीपीसीआर चाचण्यांवर भर द्यावा. आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट 24 तासांत मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करा. बाधित रुग्णांची ने-आण करण्यासाठी खासगी वाहने भाड्याने घ्यावीत त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मदत घेण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत.

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ रुग्णांना नाकारला जाणार नाही याकडे जिल्हा शल्यचिकित्सकांनी विशेष लक्ष द्यावे. कोविड सेंटर्समधील वातावरण, स्वच्छता, भोजनाचा दर्जा, स्वच्छतागृहांची साफसफाई यासाठी नियंत्रण ठेवावे. आवश्यकता भासल्यास अन्य विभागातील कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी असेही आरोग्यमंत्री म्हणाले.

Published by: Sunil Desale
First published: April 15, 2021, 8:19 PM IST

ताज्या बातम्या