मुंबई, 22 एप्रिल: कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार (Maharashtra Government)कडून अनेक उपाययोजना सुरू आहेत. मात्र, असले तरी बाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होताना दिसत आहे. केवळ बाधितांच्या संख्येतच नाही तर मृतकांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात आरोग्य यंत्रणेवर भार पडत आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना बेड्स मिळत नाहीये तर कुठे ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे.
दोन दिवसांत 1 लाख 34 हजारांहून अधिक रुग्ण
महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांत (21 एप्रिल 2021 आणि 22 एप्रिल 2021) तब्बल 1 लाख 34 हजार 481 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. 21 एप्रिल 2021 रोजी महाराष्ट्रात 67,468 रुग्णांची नोंद झाली होती तर 22 एप्रिल 2021 रोजी राज्यात 67,031 नवीन रुग्णांची भर पडली आहे.
दोन दिवसांत 1136 मृत्यू
21 एप्रिल 2021 रोजी महाराष्ट्रात 568 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती तर गुरुवारी, 22 एप्रिल 2021 रोजी पुन्हा 568 मृत्यूची नोंद झाली आहे. बाधित रुग्णांच्या सोबतच मृतकांच्या संख्येत होणारी वाढ ही निश्चितच चिंतेत भर टाकणारी आहे.
वाचा :सरकारला पुढील 10 दिवसांची भीती! कडक लॉकडाऊन कशासाठी याची Inside Storyमहाराष्ट्रात सक्रिय रुग्ण किती?
आज राज्यात 67013 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 568 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.53% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,48,95,986 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 40,94,840 (16.45 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज रोजी एकूण 6,99,858 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात कडक निर्बंध लागू
महाराष्ट्रात कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध 22 एप्रिल 2021 रोजी रात्री 8 वाजल्यापासून 1 मे 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असणार आहेत. यानुसार केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच घराबाहेर पडण्याची परवानगी आहे. तर इतर नागरिक वैद्यकीय, अत्यावश्यक असल्यासच घराबाहेर पडू शकतात. प्रवासी वाहतूक बंद असणार आहे. बस सेवा आणि लोकल सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू राहणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.