मुंबई, 3 जून : महाराष्ट्रात कोरोनाने (Maharashtra Corona) पुन्हा एकदा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 1 हजार 134 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मुंबईतील (Mumbai Corona Patients) रुग्णांची संख्या सर्वाधित आहे. मुंबईत आज दिवसभरात तब्बल 763 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धाकधूक वाढली आहे. विशेष म्हणजे कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क झालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारला (Maharashtra Government) पत्र पाठवलं आहे. या पत्रात केंद्र सरकारने राज्याला रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर राज्यात टेस्टिंग (Covid test) आणि लसीकरणावर (vaccination) भर देण्याची सूचना केली आहे. त्यानंतर मुंबईत महापालिका आयुक्तांनी देखील आरोग्य यंत्रणेला पत्र पाठवत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात आज दिवसभरात 1134 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईत 763 रुग्ण आढळल आहेत. राज्यात दिवसभरात 563 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यापैकी मुंबईतील 352 रुग्णांचा समावेश आहे. मुंबईत सध्या सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या आहे. मुंबईत सध्याच्या घडीला 3735 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे. त्यापाठोपाठ ठाणे, पुणे आणि रायगडमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या जास्त आहे. मुंबई महापालिका आयुक्तांच्या आरोग्य यंत्रणेला सूचना मुंबईतील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेऊन महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल सतर्क झाले आहेत. चहल यांनी आरोग्य यंत्रणेला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. कानपूर आयआयटीच्या तज्ज्ञांनी कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत भविष्यवाणी केली आहे. त्यांनी जुलै 2022 मध्ये कोरोनाची चौथी लाट येईल, अशी शक्यता वर्तवली आहे. त्यांनी याआधीच्या लाटांबाबत वर्तवलेले अंदाज खरे ठरले आहेत. त्यामुळे चौथ्या लाटेची शक्यता नाकरता येत नाही. याच पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईंकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. याशिवाय पावसाळा जवळ आला आहे. त्यामुळे जलजन्य आजारांचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना करणं जरुरीचं आहे, असं चहल म्हणाले आहेत. ( राज्यसभेच्या निवडणुकीआधी महाविकास आघाडीची धाकधूक का वाढली? आठ तटस्थ आमदारांभोवती महाराष्ट्राचं राजकारण ) कोरोना आणि पावसाळा या दोन्ही परिस्थिचा सामना करण्यासाठी महापालिकेकडे आवश्यक यंत्रणा आहे. तरीही नियमितपणे आढावा घेणं आणि यंत्रणा सुसज्ज राखणे गरजेचं आहे, असं चहल यांनी सागितलं आहे. चहल यांनी मुंबईत कोविड टेस्टिंग ही 8 हजारांवरुन 30 ते 40 हजारांपर्यंत वाढवण्याची सूचना केली आहे. ज्या भागांमध्ये कोरोना रुग्ण आढळतील तिथे चाचण्या मोठ्या प्रमाणात करा, असा आदेशही आयुक्तांनी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.