मुंबई, 8 मार्च : कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांमुळे शेतकरी (Farmer) अडचणीत येतो. या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला तात्पुरता दिलासा देण्यासाठी सरकारकडून कर्जमाफीचा निर्णयही अनेकदा घेतला जातो. मात्र सरकारने असा निर्णय घेताच वेळेत कर्ज फेडणाऱ्यांचं काय, अशी ओरड सुरू होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मांडलेल्या यंदाच्या अर्थसंकल्पात (Maharashtra Budget 2021) महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
'ज्या शेतीने राज्य अर्थव्यवस्थेला भक्कम आधार दिला त्या शेती क्षेत्रास आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारे अनेक निर्णय आजच्या अर्थसंकल्पात घेण्यात आले आहेत. यात 3 लाखापर्यंतचे पीककर्ज वेळेत फेडणाऱ्या शेतकऱ्याला शून्य टक्के व्याजदराची योजना ही अतिशय महत्वाची आहे,' अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना दिली आहे.
हेही वाचा -अर्थसंकल्पावर उलट-सुलट प्रतिक्रिया येत असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जोरदार बॅटिंग
'कृषी उत्पन्न बाजार समित्यांना मजबूत करणारी योजना निश्चितपणे शेतकऱ्यांना उपयोगी ठरेल. शेती आणि शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी सौर कृषी पंपाच्या माध्यमातून शेतीला दिवसा पाणी देण्यासाठी अखंडित वीज पुरवठा, कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना, कृषी उत्पादनांना हमी नाही तर विकेल तेच पिकेलच्या माध्यमातून हमखास भाव मिळवून देण्याचे शासनाचे प्रयत्न भविष्यात या क्षेत्राला अधिक बळकटी देतील,' असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
'महाराष्ट्र मोठी भरारी घेणार...'
'कोरोनामुळे स्थुल राज्य उत्पन्नात 8 टक्के घट होऊनही कृषी, पायाभूत सुविधांची कामे तसेच उद्योग व गुंतवणुकीला अधिक चालना देऊन महाराष्ट्र मोठी भरारी घेईल. आज सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्य यंत्रणेला मजबूत करण्यासाठी केलेली तरतूद निश्चितच महाराष्ट्र सुदृढ करणारी ठरेल. सर्व क्षेत्रात घसरण होत असतांना 11.7 टक्के इतकी विक्रमी वाढ नोंदवणाऱ्या कृषी क्षेत्राला अधिक बळकटी देण्यात येईल. हा अर्थसंकल्प पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देतांना समाजातील सर्व घटकांना दिलासा देणारा आहे,' असा दावा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.