महाआघाडीच्या पत्रकार परिषदेकडे विखे पाटलांनी फिरवली पाठ!

महाआघाडीच्या पत्रकार परिषदेकडे विखे पाटलांनी फिरवली पाठ!

काँग्रेस-राष्ट्रवादीने आज पत्रकार परिषद घेऊन अखेर महाआघाडीची घोषणा केली. परंतु, या पत्रकार परिषदेला काँग्रेस विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील गैरहजर होते.

  • Share this:

23 मार्च : काँग्रेस-राष्ट्रवादीने आज पत्रकार परिषद घेऊन अखेर महाआघाडीची घोषणा केली. परंतु, या पत्रकार परिषदेला काँग्रेस विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील गैरहजर होते. विखे पाटलांच्या अनुउपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी समविचारी पक्षांना एकत्र घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाआघाडीची घोषणा केली. अखेर चार महिन्यांच्या कालावधीनंतर दोन्ही पक्षांकडून आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन महाआघाडीची घोषणा केली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार ,जितेंद्र आव्हाड तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी हजर होते.

महाआघाडीचे सर्व नेते हजर असताना विखे पाटलांनी मात्र, पाठ फिरवली. विखे पाटील हे आज आपल्याच मतदारसंघात आहे. त्यामुळे ते मुंबईला आलेच नाही. त्यांच्यासह मुंबईचे शहर अध्यक्ष संजय निरुपम, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देखील अनुउपस्थित होते. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच विखेंचा मुलगा सुजय हा भाजपात दाखल झाला. राधाकृष्ण विखे सुद्धा भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, आपण काँग्रेसमध्येच राहणार असं स्पष्ट केलं. परंतु, शिर्डीत सेनेच्या उमेवादाचा आणि नगरमध्ये आपल्या मुलाचा प्रचार करणार असं विखेंनी सांगितल्याचं सेनेच्या नेत्याने काल दावा केला होता.

विखे पाटलांची नेमकी भूमिका आहे यावरून काँग्रेसमध्ये वाद सुरू आहे. त्यातच आज झालेल्या महाआघाडीच्या पत्रकार परिषदेला विखेंनी सपशेल पाठ फिरवली आहे.

अब्दुल सत्तारांनी दिला राजीनामा

लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने उमेदवारी न दिल्याने सिल्लोडचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला आहे. 'मला लोकांमध्ये जाऊन नशीब अजमावयाचे आहे. मी लोकसभा निवडणूक लढवणारच,' असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसमधून बंडखोरी केली आहे.

'मी कुणावरही नाराज नाही. मी औरंगाबादमधून उमेदवारी मागितली होती. पण पक्षाने मला उमेदवारी दिली नाही. मी काँग्रेसचा राजीनामा आधीच दिलेला आहे. आता काँग्रेस आमदार म्हणून बोलत नाही. मी लोकसभा निवडणुकीत अपक्ष लढत देणार आहे,' अशी घोषणाही अब्दुल सत्तार यांनी केली आहे.

'मला माझ्या लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे. आता मी माघार घेणार नाही,' असा आक्रमक पवित्रा सत्तारांनी घेतला आहे.

दरम्यान, रात्री उशीरा काँग्रेसने महाराष्ट्रातील पाच उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये औरंगाबादच्या उमेदवाराचाही समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आणखी पाच मतदारासंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये लातूर, चंद्रपूर, जालना, औरंगाबाद आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. काँग्रेसकडून अनेक नवख्या उमेदवारांना संधी देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.

काँग्रेसचे आतापर्यंत जाहीर झालेले उमेदवार

नागपूर- नाना पाटोले

गडचिरोली- नामदेव उसेंडी

मुंबई उत्तर-मध्य - प्रिया दत्त

दक्षिण मुंबई - मिलिंद देवरा

सोलापूर- सुशिलकुमार शिंदे

नंदूरबार - के. सी. पडवी

धुळे - कुणाल रोहिदास पाटील

वर्धा - चारूलता ठोकस

यवतमाळ-वाशिम - माणिकराव ठाकरे

दक्षिण-मध्य मुंबई - एकनाथ गायकवाड

शिर्डी - भाऊसाहेब कांबळे

रत्नागिरी - नविनचंद्र बांदिवडेकर

=============

First published: March 23, 2019, 4:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading