मुंबई, 19 जानेवारी : चौदा विद्या, चौसष्ठ कलांचा अधिपती असलेल्या गणरायाच्या माघ महिन्यातील गणेश जयंती उत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. गणेश मूर्तीची नोंदणी आणि खरेदी, मखर, फुले, दिव्यांच्या माळा, दिवे, कागदी आणि कापडी तोरण, हार, पूजेचे तसंच प्रसादाचे साहित्य खरेदीसाठी मुंबईच्या दादरमधील बाजारपेठेत गणेशभक्तांची गर्दी दिसत आहे. बाजारात काय आहे खास? सर्वांचा लाडका बाप्पा 25 जानेवारी रोजी वाजत-गाजत घराघरात तसंच सार्वजनिक मंडळात विराजमान होणार आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी सगळीकडं जय्यत तयारी सुरू आहे. मूर्ती निवडण्यापासून बाप्पाला घरी आणण्याची लगबग सुरू होते. मुंबईच्या वेगवेगळ्या भागात गणेशमूर्तीची दुकानं सध्या पाहायाला मिळत आहेत. गणरायाच्या सभोवताली आकर्षक सजावट करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. दादरची बाजारपेठ त्यासाठी लागणाऱ्या सजावटीच्या साहित्यानं फुलली आहे. कृत्रिम फुलांची आरास, कापडाचे गणेश मंदिर, घडी करता येणारे बाप्पाचे आकर्षक आसन अशी वेगवेगळे साहित्य सध्या उपलब्ध आहेत. त्याची किंमत 400 रूपयांपासून पुढे आहे. त्याचबरोबर रंगीत झिरमिळ्या, गणरायाची नावे, मूषक असे विविध कटआऊट 50 रुपयांपासून पुढे उपलब्ध आहेत. काय आहे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीचा इतिहास? पाहा Video दादरमधल्या बाप्पा मोरया या दुकानाचे कर्मचारी सागर सांगतात की, ‘माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र पुन्हा एकदा चैतन्य, आनंद आणि उत्साही वातावरण आहे. श्रींच्या मूर्तींची निवड आधीच झाली आहे. आता सर्वांना त्यांच्या आगमनाचे वेध लागले आहेत. त्यापूर्वी गणरायाच्या स्वागतात कुठेही कमतरता पडू नये, यासाठी गणेशभक्त प्रयत्न करत आहेत.
बाप्पाच्या पूजेत विघ्न येऊ नये, त्यासोबत बाप्पाची सजावट सुंदर असावी, यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहेत. पूजेचं साहित्य म्हणून कंठी, मुकूट, धोतर तसंच फेटा खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढत आहे. 40 ते 1100 रुपयांपर्यंत या वस्तूंची किंमत आहे.’