Home /News /mumbai /

मराठा आरक्षणावरून राजू शेट्टी यांनी ठाकरे सरकारकडे केली 'ही' मागणी

मराठा आरक्षणावरून राजू शेट्टी यांनी ठाकरे सरकारकडे केली 'ही' मागणी

'मराठा समाजातील शैक्षणिक प्रवेश घेणाऱ्या विशेषतः 11 वीच्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे.'

    मुंबई, 11 सप्टेंबर : 'सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे राज्यातील मराठा समाजातील शैक्षणिक प्रवेश घेणाऱ्या विशेषतः 11 वीच्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. या धर्तीवर मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून राज्य शासनाने तात्काळ सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि तोपर्यंत अध्यादेश काढून प्रवेश प्रक्रिया आरक्षणानुसार सुरळीत चालू करावी,' अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. 'मराठा हा बहुसंख्य समाज शेतकरी आहे. शेतीची परिस्थिती दयनीय झाली आहे. मुलांची फी भरण्याची आर्थिक कुवत शेतकऱ्यांमध्ये नाही. आरक्षण मिळालं तर त्यांना फी सवलत किंवा शिष्यवृत्ती मिळेल. त्यामुळे अर्धवट शिक्षण सोडण्याची वेळ मराठा समाजातील विद्यार्थ्यांवर येणार नाही. म्हणून आज महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका तत्काळ दाखल करावी व तोपर्यंत अध्यादेश काढून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आग्रही मागणी आहे,' असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. उदयनराजेंचा सरकारला इशारा मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर भाजपने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनीही सरकारवर घणाघाती टीका करत इशारा दिला आहे. 'मी सरकारला जाहीर आवाहन करतो. सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावं. अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे. कारण मराठा समाज आता एकटा नाही एवढच सांगतो,' असा आक्रमक इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Maratha reservation, Raju shetty

    पुढील बातम्या