कल्याण, 30 जानेवारी : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकामांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या बांधकामावर अंकुश ठेवणं महापालिकेच्या आवाक्याबाहेर असलं, तरीही आता ग्राहकांना मात्र आपण घेत असलेलं घर अधिकृत आहे की अनधिकृत, हे जाणून घेता येणार आहे. त्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने (KDMC) एक खास टोल फ्री क्रमांक तयार केला आहे. त्यामुळे घर खरेदी करणाऱ्यांची फसवणूक होण्यापासून वाचणार आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकामांची संख्या मोठी आहे. फक्त चाळीच नव्हे, तर ७-७ मजल्यांचे टॉवर्सही अनधिकृतपणे उभारण्यात आले आहेत. या बांधकामांवर अंकुश ठेवणं महापालिकेच्या आवाक्याबाहेर गेलंय. शिवाय या बांधकामांमध्ये घर घेऊन फसवणूक होणाऱ्या नागरिकांनाही नंतर मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळेच आता कल्याण डोंबिवली महापालिकेनं एक टोल फ्री क्रमांक जाहीर केलाय. केडीएमसीने 18002337295 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून बांधकामाबाबतची माहिती घ्यायचं आवाहन केलं आहे.
तुम्ही जर कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत घर घेत असाल, तर या क्रमांकावर फोन करून तुमचं घर, इमारत अधिकृत आहे की अनधिकृत हे तुम्हाला जाणून घेता येणार आहे. केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. यामुळे नागरिकांची फसवणूक होण्यापासून वाचणार आहे, साहजिकच अनधिकृत बांधकामांना आळा बसणार आहे. महापालिकेच्या या नव्या आयडियामुळे अनधिकृत बांधकामधारकांचे धाबे मात्र दणाणले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: KDMC