मोठी बातमी : JEE आणि NEET ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकलमध्ये प्रवास करण्याची मुभा

मोठी बातमी : JEE आणि NEET ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकलमध्ये प्रवास करण्याची मुभा

विद्यार्थ्यांमध्ये काहीसं तणावाचं वातावरण असतानाच दिलासादायक बातमी आली आहे.

  • Share this:

मुंबई, 31 ऑगस्ट : कोरोना व्हायरसचं संकट आणखी गडद होत असतानाच JEE आणि NEET परीक्षेच्या तारखांची घोषणा करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये काहीसं तणावाचं वातावरण असतानाच दिलासादायक बातमी आली आहे. या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

रेल्वेच्या निर्णयानुसार पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये परीक्षार्थी विद्यार्थ्यांना प्रवास करण्यास सूट देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचं ऍडमिटकार्ड पाहून त्यांना रेल्वे स्टेशनवर येऊ दिलं जाईल. गर्दी टाळण्यासाठी परीक्षेच्या दिवशी रेल्वे स्थानकावर अतिरिक्त तिकीट काऊंटर सुरू केले जाणार आहेत.

इतरांना प्रवेश नाही!

कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात लोकल सेवा बंद करण्यात आली होती. नंतरच्या काळात अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू करण्यात आली. अनलॉकचा चौथा टप्पा सुरू झाला तरीही मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आलेली नाही. आता प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लोकल प्रवाशाची मुभा देण्यात आली असली तरी इतरांना मात्र प्रवेश देणार नसल्याचं स्पष्टीकरण रेल्वेने दिलं आहे.

अनलॉकच्या चौथ्या टप्प्याबाबत गाईडलाईन्स

मुंबई आणि MMR मध्ये शासकीय कार्यालय 30 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत, तर उर्वरित महाराष्ट्रात शासकीय कार्यालयात 50 टक्के कर्मचारी उपस्थित राहतील. या सर्व कार्यालयांमध्ये सोशल डिस्टन्स या नियमावलीचे पालन करणे अनिवार्य राहील. शाळा मात्र सप्टेंबर अखेर पर्यंत सुरु करता येणार नाहीत. ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे लागेल. त्याचबरोबर कॅन्टोन्मेंट झोन भागांमध्ये आधीचेच नियमावली परत लागू राहील. स्थानिक परिस्थिती बघून जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त याबाबत अंतिम निर्णय घेतील.

Published by: Akshay Shitole
First published: August 31, 2020, 9:13 PM IST

ताज्या बातम्या