मुंबई, 14 ऑक्टोबर : मुंबईतील आरेमधील मेट्रो कारशेड कांजुरमार्ग इथं हलवण्याचा राज्य सरकारने निर्णय जाहीर केला आहे. भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारचा निर्णय चुकीचा असल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर कारशेड कांजुरमार्गला हलवणे किती चुकीचे आहे, त्याबद्दल पुरावेच दिले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी एकापाठोपाठ एक ट्वीट करून मेट्रो कारशेडच्या निर्णयाबद्दल खुलासा केला आहे. 'मेट्रो 3 आणि मेट्रो 6 या दोन मार्गिकांना एकात्मिक करून कांजुरमार्ग येथे कारशेड प्रस्तावित करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संकल्पना त्यांनीच स्थापन केलेल्या तज्ञ समितीने यापूर्वीच नाकारली होती' असा खुलासा केला आहे.
'मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आरेची जागा हा एकमात्र व्यवहार्य पर्याय होता. आर्थिकदृष्ट्या सुद्धा तो किफायतशीर होता आणि पर्यावरणीय परिणाम कमीत कमी होईल, हा विचार केल्याने तो अधिक शाश्वत पर्याय सुद्धा होता' असं ठाम मत फडणवीस यांनी व्यक्त केले.
मुंबईकरांचा धडधडीत विश्वासघात!
मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आरेची जागा हा एकमात्र व्यवहार्य पर्याय होता. आर्थिकदृष्ट्या सुद्धा तो किफायतशीर होता आणि पर्यावरणीय परिणाम कमीत कमी होईल, हा विचार केल्याने तो अधिक शाश्वत पर्याय सुद्धा होता. #MVAbetrayMumbaikars
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 14, 2020
'अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या नेतृत्त्वातील समितीने याबद्दल काही निरीक्षण नोंदवली आहे. आरे कारशेडचे नियोजन करताना पर्यावरण रक्षणावर सर्वाधिक भर देण्यात आला. कार्बन उत्सर्जन कमी करणे, सोलार पॅनल्स, सांडपाण्यावर प्रक्रिया आणि पुनर्वापर, वीजवापर कमी करण्यासाठी एलईडी लाईट्स इत्यादींचे नियोजन असे ते निरीक्षण आहे. या प्रकल्पाला आणखी विलंब करण्यामुळे कार्बनचे उत्सर्जन आणखी वाढणार आहे, त्यामुळे वृक्षतोडीच्या परिणामांच्या तुलनेत आरेचीच जागा अधिक पर्यावरणपूरक आहे, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.
'2015 मध्ये आमच्या सरकारने कांजुरमार्ग येथील पर्याय विचारात घेतला होता. तथापि, त्यासाठी लागणारा विलंब आणि जमिनीसंदर्भातील विविध कायदेशीर अडचणींमुळे या पर्यायावर विचार थांबविण्यात आला. प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या 17 जानेवारी 2020 च्या स्थळपाहणी अहवालावरून असे लक्षात येते की, कांजुरमार्ग येथील प्रस्तावित जागा अद्यापही विवादित आहे' असंही फडणवीस म्हणाले.
'कारशेडसाठी जागेच्या उपलब्धतेनंतर मेट्रो कार्यान्वयनासाठी 4.5 वर्ष लागणार, जेव्हा की, ही मेट्रो डिसेंबर 2021 मध्ये कार्यान्वित होणार होती. शिवाय, कांजुरमार्ग येथील जमिनीची सद्यस्थिती पाहता कंत्राट दिल्यानंतर, त्या जागेचे स्थिरीकरण, इत्यादीसाठी 2 वर्ष कालावधी लागणार आहे. कारडेपो कांजुरमार्ग येथे स्थानांतरित करून मेट्रो-3चे प्रश्न तर सुटणार नाहीच, शिवाय मेट्रो 3 आणि 6 अशा दोन्ही मेट्रोच्या फेर्या मोठ्या प्रमाणात प्रभावित होणार आहेत' असाही दावा फडणवीसांनी केला.
मुंबईकरांच्या हालअपेष्टांमध्ये वाढ!
कारशेडसाठी जागेच्या उपलब्धतेनंतर मेट्रो कार्यान्वयनासाठी 4.5 वर्ष लागणार, जेव्हा की, ही मेट्रो डिसेंबर 2021 मध्ये कार्यान्वित होणार होती. #MVAbetrayMumbaikars pic.twitter.com/Kz60NGk1b6
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 14, 2020
मेट्रो-6च्या आरे ते कांजुरमार्ग या भागात विविध मार्गावरील मिश्र रेल्वे वाहतुकीमुळे मेट्रो-6 च्या कार्यान्वयनात तर प्रचंड गुंतागुंत निर्माण होईलच तसेच याचा मेट्रो-3 वरही परिणाम होईल. आणि या दोन्ही मेट्रोंच्या कार्यान्वयीन क्षमतेवर परिणाम होईल, शिवाय नुकसानही वाढेल.
त्रिपक्षीय करारानुसार, प्रकल्पाच्या कार्यकक्षेत, कालावधीत होणारे बदल किंवा अन्य कुठल्याही कारणामुळे होणारा विलंब याचा संपूर्ण आर्थिक भार हा राज्य सरकारलाच उचलावा लागणार आहे, असा दावाही फडणवीस यांनी केला आहे.
'एवढेच नव्हे तर 1 ऑक्टोबर 2020 रोजी मुंबई जिल्हाधिकार्यांनी कांजुरमार्गची जागा हस्तांतरित करताना ही अट स्पष्टपणे नमूद केली आहे की, या जागेशी संबंधित दावे प्रलंबित असल्यास त्यावरील खर्च हा ‘एमएमआरडीए’लाच सोसावा लागणार आहे', असंही फडणवीस यांनी म्हटले आहे.
पर्यावरणासाठी संघर्ष करणार्यांचा मी सन्मानच करतो. पण, आरे कारशेडची जागा ही कोणताच अन्य पर्याय शिल्लक न राहिल्याने निश्चित करण्यात आली होती.
पण, आता हेच पर्यावरणवादी मिठागाराच्या जागेवर, कांदळवन असलेल्या जागेवर, वन संरक्षित जागेवर कारशेडचे समर्थन करणार का? असा सवालही फडणवीसांनी विचारला आहे.