मुंबई, 27 जानेवारी : संपूर्ण देशभर प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन या दिवशी अनेक जण हातामध्ये तिरंगा घेऊन मिरवतात. या राष्ट्रध्वजाचं दुसऱ्या दिवशी काय होतं हे कुणीच पाहत नाही. तिरंग्याची शान जपण्यासाठी एक मुंबईकर सॉफ्टेवेअर इंजिनिअर गेल्या 18 वर्षापासून झटतोय. काय आहे मिशन? मुंबईतील माहीम परिसरात राहणारे प्रशांत जनार्दन पळ हे गेल्या 18 वर्षापासून न चुकता 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या दिवशी मुंबईतील रस्त्यांवर पडलेले तिरंगी झेंडे गोळा करत असतात. प्रशांत यांनी 2005 साली सर्व प्रथम तिरंगा उठाव मोहीम सुरू केली. त्यानंतर ते दादर, माहीम परिसरात हे काम नियमितपणे करतात. 26 जानेवारीला कोल्हापूरकर जिलेबी का खातात? पाहा Video स्वातंत्र्य दिन आणि आणि प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी पदपथावर पडलेले राष्ट्रध्वज पायाखाली येऊन त्याचा अपमान होऊ नये यासाठी मी हे काम करतोय. गेल्या अठरा वर्षांमध्ये आत्तापर्यंत 8 लाखांपेक्षा जास्त झेंडे जमा केले आहेत. या सर्व तिरंग्याचा सन्मानानं विनियोग आम्ही करतो.
आपली ही मोहीम इतरांना समजावी. नव्या पिढीला देखील याचं महत्त्व समजावं यासाठी प्रशांत हे शालेय विद्यार्थी आणि सर्वसामान्य मुंबईकरांमध्येही या विषयात जागृती करतात. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या प्रशांतने हे आपल्या आयुष्याचं मिशन केलंय. त्यांनी यंदाही प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी मुंबईतल्या मध्यवर्ती भागामध्ये फिरुन रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा केले तसंच शालेय विद्यार्थी आणि नागरिकांशी या विषयावर संवाद साधला. या संवादाच्या माध्यमातून त्यांनी हजारो मुंबईकरांना त्यांच्या चुकीची जाणीव करुन देत त्यांच्यात जागृती केली आहे.